‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी चिंचवडमध्ये
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “देहू आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालणाऱ्या वारीचा अनुभव आणि त्यातून मिळणारे आत्मिक समाधान अवघ्या अडीच तासांत देण्याचा प्रयत्न ‘अंतर्नाद’ या संगीत नाटकातून करण्यात आला आहे. स्वतःमधील विठ्ठल शोधण्यासाठी आणि अंतर्मनातील नाद समजून घेण्यासाठी सर्वांनी या शुभारंभाच्या प्रयोगाला उपस्थित राहावे,” असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष व ‘अंतर्नाद’चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी केले.
पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दिग्दर्शक मनोज डाळिंबकर, संगीतकार निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, प्रणव सपकाळे, राजू बंग आदी मान्यवर उपस्थित होते.
या नाटकात ५१ कलाकारांचा समावेश असून अभंग, गवळण, भारूड आणि पोवाड्यांचा सात्विक मिलाफ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्याचे आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचे जिवंत चित्रण यात आहे. दिंडीत सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याची विठ्ठल भक्ती आणि त्याचा अंतर्मनातील प्रवास म्हणजे ‘अंतर्नाद’ होय. या नाटकातील साहित्य आणि संगीत जुन्याची कॉपी नसून सर्व नवीन आहे, तसेच लोकसंगीतातील बहुतांश सर्व वाद्यांचा वापर करण्यात आला आहे.
शनिवार, दि. १६ मे २०२६, सायंकाळी ७:०० वाजता, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, शुक्रवार, दि. २२ मे २०२६, सायंकाळी ७:०० वाजता, विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर, नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’, ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणि नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत.
नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळींबकर यांचे आहे. संगीताची धुरा निरंजन पेडगावकर यांनी सांभाळली असून मुराद तांबोळी यांनी गीते शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. प्रकाश योजना अभिप्राय कामठे, रंगभूषा कमलेश बिचे आणि वेशभूषा वेदिका काळे यांची आहे.
वारकरी परंपरेला अभिवादन करणारी ही आधुनिक कलाकृती नवी पिढी आणि ज्येष्ठ अशा सर्वांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
