news
पिंपरी-चिंचवडला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापौर रवि लांडगे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मनपा आयुक्तांना दिला कृती आराखडा‘वायसीएम’ डॉक्टरांनी घडवला चमत्कार! फुगेवाडी विषारी मद्यबाधित तिन्ही रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून काढले सुखरूप बाहेरचिखलीतील राडा राजकीय की पूर्वनियोजित? एमआयएम प्रवक्त्या रुहीनाज शेख यांचा थेट स्थानिक आमदारावर निशाणापिंपरी मनपाच्या बांधकाम विभागाविरुद्ध नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे आक्रमक! किवळे-रावेत भागातील ‘बिल्डर पॅटर्न’वर निवेदनातून कडाडून हल्लापुनावळेकरांच्या हक्काच्या जागेवर खाजगी डल्ला? नगरसेविका रेश्मा भुजबळ मनपा आयुक्तांवर आक्रमक
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा दणका! निगडीत मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या रासायनिक ताडीचा अड्डा उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा दणका! निगडीत मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या रासायनिक ताडीचा अड्डा उद्ध्वस्त

४०० लिटर कृत्रिम ताडीसह 'क्लोरल हायड्रेट' जप्त; यकृत निकामी करणाऱ्या विषारी ताडीप्रकरणी दोन आरोपी गजाआड, आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने धडक कारवाई | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडीत मानवी जिवाशी खेळणारी रासायनिक विषारी ताडी निर्मिती उद्ध्वस्त; ४०० लिटर ताडीसह ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त, दोन आरोपींना बेड्या!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

निगडी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध दारू, हातभट्टी आणि मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या भेसळयुक्त रासायनिक ताडीच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने एका मोठ्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत मानवी शरीराला अत्यंत घातक असणाऱ्या ‘क्लोरल हायड्रेट’ (Chloral Hydrate) या रसायनाचा वापर करून तयार केलेली तब्बल ४०० लिटर कृत्रिम व विषारी ताडी आणि ती बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अट्टल आरोपींना रंगेहात अटक केली आहे.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. रोहिदास पवार यांनी अवैध दारू व भेसळयुक्त मद्य आणि रासायनिक ताडीच्या निर्मितीविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दारूबंदी पथक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर भागात क्लोरल हायड्रेट या मानवी शरीराला अत्यंत अपायकारक असलेल्या रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम व विषारी ताडी बनवून विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ट्रान्सपोर्ट नगरमधील संशयास्पद अड्ड्यावर तातडीने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ४०० लिटर तयार रासायनिक भेसळयुक्त विषारी ताडी, ताडी बनवण्यासाठी लागणारे केमिकल आणि इतर सर्व साहित्य जप्त केले. ही ताडी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, तिच्या सेवनाने यकृत निकामी होणे, अंधत्व येणे किंवा गंभीर शारीरिक दुष्परिणामांसह मृत्यू ओढवण्याची दाट शक्यता असते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून खालील दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.  मौनेश यंकप्पा गुत्तेदार (वय २४ वर्षे, रा. पोरंमवाल चौक, देहूगाव, पुणे. मूळ रा. रायचूर, कर्नाटक)  लक्ष्मण गुंडप्पा हुलसुरे (वय २६ वर्षे, रा. टी.व्ही. शोरूमच्या पाठीमागे, आंबेडकर नगर, देहूगाव, पुणे. मूळ रा. ता. निलंगा, जि. लातूर)

या दोन्ही आरोपींविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिसांमार्फत अवैध दारू, भेसळयुक्त मद्य आणि विषारी ताडीची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अत्यंत कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. नागरिकांना आपल्या परिसरात अशा प्रकारचा कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांच्या अधिकृत मोबाईल क्रमांक ७७९८१००११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. रोहिदास पवार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) डॉ. विशाल हिरे आणि सपोआ श्री. अनिल मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या धडक कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भास्कर पुल्ली, सपोनि श्री. दादासो मोरे, सपोफौ राकेश पालांडे, पोह सागर सूर्यवंशी, विक्रांत चव्हाण, शरद गर्जे, पोना/सचिन गोनटे, पोलीस अंमलदार उद्धव खेडकर, सुमित देवकर, लक्ष्मीकांत पतंगे, शमसुंदर गुगे आणि मितेश यादव यांनी सहभाग घेतला. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करत आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!