पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना ‘पथ विक्रेता कायद्या’चा विसर? कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा घणाघाती आरोप; ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , ९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील महत्त्वाच्या ‘पथ विक्रेता समिती’ची (Town Vending Committee) एकही बैठक घेतलेली नाही. या कायद्यानुसार महापालिका आयुक्त हे स्वतः या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांना कायद्याचे गांभीर्य आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे फेरीवाल्यांबाबतचे कडक आदेश समजलेलेच दिसत नाहीत. समितीला अंधारात ठेवून ८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची परस्पर बैठक घेऊन हॉकर्स झोन जाहीर करण्याचे बेकायदेशीर आदेश आयुक्त देत आहेत. हा पूर्णतः हुकूमशाही कारभार असून कायद्याचा अभ्यास न करता घेतलेले हे सर्व निर्णय गोरगरीब कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत,” अशी घणाघाती टीका कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
या संदर्भात काशिनाथ नखाते यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना तीव्र आक्षेप घेणारे पत्र पाठवले असून, मनमानी कारभार न थांबल्यास थेट ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
काशिनाथ नखाते यांनी महापालिकेच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. कायद्याला केराची टोपली दाखवून लहरी राजासारखे बेकायदेशीर आदेश दिले जात आहेत आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आपली मान हलवून केवळ ‘जी हुजूर’ म्हणत या आदेशांचे पालन करत आहेत. पथ विक्रेता कायदा आणि फेरीवाला संघटनांच्या सहभागाशिवाय आयुक्तांना अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.”
“महानगरपालिकेत नवीन रुजू झालेले आयुक्त जॅकेट घालून आले, तेव्हा त्यांच्या स्टाईलने अनेक जण प्रभावित झाले होते. शहरवासीयांना त्यांच्याकडून विकासाची खूप अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात शहरात कोणतेही मोठे विकासकाम होताना दिसत नाही. केवळ अंतर्गत भ्रष्टाचाराच्या खमंग बातम्या, संशयास्पद कारभार आणि गरिबांच्या हातगाड्यांवर होणारी कारवाई एवढाच विषय सध्या शहरात सुरू आहे. सामान्य नागरिकांना चांगले आरोग्य, स्वच्छ व नियमित पाणी आणि खड्डेमुक्त सुंदर रस्ते देण्याऐवजी आयुक्त केवळ बैठकांचा फार्स उभा करून गप्पा मारत आहेत. महापालिकेत सुरू असलेल्या बोगस आणि अनियमित कामांवर आयुक्त सोयीस्कर मौन बाळगून आहेत,” असा थेट आरोप नखाते यांनी केला.
नखाते यांनी पत्रात म्हटले आहे की, “आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे केवळ धनिक, मोठे व्यावसायिक आणि श्रीमंत कंपनी मालकांसाठीच काम करण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न आज सामान्य कष्टकऱ्याला पडला आहे. त्यांची उठबस नेहमी बड्या बिल्डरांसोबत आणि धनिकांसोबत असते. मोठमोठ्या बिल्डरांचे अनधिकृत कारनामे आणि बांधकामे वाचवायची आणि रस्त्यावर घाम गाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब पथविक्रेत्याला मात्र उद्ध्वस्त करायचे, हा कुठला न्याय? गोरगरीब फेरीवाल्यांना वाईट शब्दात बोलण्याची प्रशासनाची हिंमत खूप वाढली आहे.”
काशिनाथ नखाते यांनी आयुक्तांना जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “सध्याच्या आयुक्तांना पूर्वसुरींचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. तत्कालीन कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव आणि राजेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात फेरीवाला संघटना आणि पथ विक्रेता समितीला नेहमीच विश्वासात घेऊन चर्चा केली होती. केंद्र सरकारची ‘पीएम स्वानिधी योजना’ काय आहे, हे आयुक्तांनी तपासून घ्यावे. एकीकडे राज्य शासन कष्टकरी आणि कामगारांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत आहे, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडचे आयुक्त मात्र गरिबांच्या चुली विझवण्यासाठी मोहीम राबवत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
महानगरपालिका आयुक्तांनी त्वरित आपली मनमानी व हुकूमशाही प्रशासकीय राजवट थांबवावी. या संवेदनशील विषयावर त्यांनी मनपाच्या कायदा विभाग आणि नगर विकास विभागाकडून त्वरित मार्गदर्शन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जर फेरीवाला संघटना आणि पथ विक्रेता समितीला विश्वासात न घेता अशीच कारवाई सुरू राहिली, तर ‘नॅशनल हॉकर फेडरेशन’ आणि ‘महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ’ यांच्या वतीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र स्वरूपाचे “जेल भरो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशारा नखाते यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
