news
Home पिंपरी चिंचवड पुण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली आंदोलनस्थळी धाव!

पुण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली आंदोलनस्थळी धाव!

"समांतर आरक्षण हटवून स्वतंत्र ५% कोटा द्या"; समाज कल्याण आणि दिव्यांग आयुक्तांना साकडे, मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षाचा रस्त्यावरील लढ्याचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पुणे स्टेशनवर एल्गार! पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा

पुणे प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: पुणे स्टेशन येथील समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध न्याय्य मागण्यांसाठी दृष्टिहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसने जाहीर आणि सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या, तसेच या संदर्भात थेट दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजित बढे आणि समाज कल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन तात्काळ तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली.

‘दृष्टी विश्व’ संस्था आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पुण्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

सामाजिक न्याय विभागाने शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये लागू केलेले दिव्यांगांचे जाचक ‘समांतर आरक्षण’ (Parallel Reservation) तात्काळ रद्द करावे आणि त्याऐवजी स्वतंत्र ५ टक्के विशेष आरक्षण लागू करावे.  राज्य सरकारच्या प्रसिद्ध ‘स्वाधार’ योजनेमध्ये सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा थेट समावेश करण्यात यावा किंवा त्याच धर्तीवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र आर्थिक साहाय्य योजना सुरू करावी.  प्रादेशिक स्तरावर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी सज्ज अशी स्वतंत्र वसतिगृहे (Hostels) उभारण्यात यावीत.  दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपोषण शिष्टमंडळ समितीची तात्काळ उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी.

आंदोलनाची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजित बढे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करताना आयुक्त बढे यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि आरक्षणाबाबतच्या मागण्यांचा सविस्तर प्रस्ताव आयुक्तालायाच्या स्तरावरून राज्य शासनाकडे आधीच मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.”

तसेच, बढे यांनी याबाबतच्या अधिकृत पत्राची प्रत काँग्रेस शिष्टमंडळाकडे सुपूर्द केली आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मनधरणी करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तात्काळ आपले उपायुक्त भारत कांबळे यांना आंदोलनस्थळी पाठवले. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतली.

विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने थेट समाज कल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची ‘बार्टी’ (BART) पुणे येथील कार्यालयात भेट घेतली व त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. वसतिगृह प्रवेशातील समांतर आरक्षण रद्द करून विशेष आरक्षण देण्याची बाब त्यांच्या अखत्यारीत येत असल्याने, यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी प्रख्यात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि त्यांचे सहकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित होते.

आपल्या हक्कासाठी रणरणत्या उन्हात आणि पावसात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये गौरव मालक, साबीर शेख, गणराज जाधव, शशिकांत शिंदे, सूरज रेपाळे, आणि शुभम नरोडे हे दिव्यांग तरुण अत्यंत खंबीरपणे सहभागी झाले आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे सर्व प्रमुख शिष्टमंडळ पुण्यातील आंदोलनस्थळी तळ ठोकून होते. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस जितेंद्र छाबडा, ज्येष्ठ नेते हरीश डोळस, संदीप शिंदे, आणि अनुसूचित जाती (SC) विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ आदी मान्यवरांचा समावेश होता.

“जोपर्यंत या वंचित आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरील लढ्यात सोबत राहील,” असा निर्धार शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!