news
Home पिंपरी चिंचवड नवे वर्ष, नवी उमेद! पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

नवे वर्ष, नवी उमेद! पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पहिले पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे आमदार शंकर जगताप व महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते औक्षण; पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तकांचे मोफत वाटप, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून विद्यार्थ्यांशी थेट संवाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ढोल-ताशांचा गजर अन् लेझीमचा ताल! पिंपरी-चिंचवड मनपा शाळांमध्ये रंगला उत्साहपूर्ण ‘शाळा प्रवेशोत्सव’; पहिल्याच दिवशी नवे गणवेश, पुस्तके मिळताच विद्यार्थ्यांचा किलबिलाट

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “भारत माता की जय” च्या गगनभेदी जयघोषात, ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि लेझीमच्या पारंपरिक तालावर अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांची घंटा अखेर वाजली. नवीन शैक्षणिक वर्षाची नवी उमेद आणि डोळ्यांत मोठी स्वप्ने घेऊन पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे पालकांसह अत्यंत हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.

भोसरी येथील इंद्रायणीनगर पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूलमध्ये महापौर रवि लांडगे यांनी तर पिंपळे गुरव येथील पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल क्रमांक ५४ येथे आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्निक उपस्थित राहून नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा केला.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वांगीण विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने कटीबद्ध आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हा निखळ आनंद आणि उत्साह पाहून मनस्वी समाधान वाटते. हीच मुले उद्याच्या विकसित भारताची खरी शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण देशात शहराचे नाव उंचावावे.”

कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलताना आमदार शंकर जगताप यांनी शिक्षणाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिक्षण संस्था अधिक बळकट कराव्या लागतील. मनपाच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि आधुनिक सुविधांमुळे आता पालकांचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मकतेने बदलत आहे. ही समाधानाची बाब असली तरी आपल्याला शिक्षणाची गुणवत्ता आणखी उंचावण्यासाठी शिक्षकांची संख्या वाढवणे, शाळांमधील ग्रंथालये अधिक सक्षम करणे आणि आवश्यक भौतिक सुविधा पुरवणे यावर विशेष भर द्यावा लागेल. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचे सुदृढ व्यक्तिमत्त्व घडवावे. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता खेळ, कला आणि उत्तम आरोग्याकडेही लक्ष द्यावे.”

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आजची शिक्षण व्यवस्था अधिक आधुनिक, डिजिटल आणि विद्यार्थीकेंद्रित झाली आहे. मनपाच्या शाळांमध्ये देखील आता सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल साधने आणि समृद्ध ग्रंथालये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सर्व सुविधांचा पुरेपूर वापर करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. अभ्यास करताना मनात कोणतीही शंका आल्यास शिक्षकांना प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका. कोणाला काय वाटेल याचा विचार न करता जे विद्यार्थी सतत प्रश्न विचारण्याची आणि उत्तरे शोधण्याची सवय लावतात, तेच पुढे जाऊन यशस्वी होतात. त्यामुळे शिक्षणाचा उद्देश केवळ परीक्षेत गुण मिळवणे नसून स्वतःचे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडवणे हा असला पाहिजे.”

या भव्य शाळा प्रवेशोत्सव उपक्रमात शहरातील विविध प्रभागांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य शशिकांत कदम, ज्ञानेश्वर जगताप, शकुंतला धराडे, शाम जगताप, नम्रता लोंढे, माजी नगरसदस्य सागर अंगोळकर, पल्लवी जगताप, विलास मडिगेरी, उप आयुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्याध्यापिका गीतांजली पोळ, आणि पर्यवेक्षक ज्योती तापकीर यांच्यासह मनपाचे सर्व संबंधित शिक्षक, पालक आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आमदार शंकर जगताप आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन रंगीबेरंगी पाठ्यपुस्तके, आकर्षक गणवेश आणि शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल, श्रीमती लीलाबाई क्रांतीलाल खिंवसरा मोहननगर मुले शाळा आणि थेरगाव शाळांमध्येही नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला. इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके, गणवेश आणि गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसदस्या अरुणा लंगोटे, वैशाली काळभोर, उप आयुक्त संदीप खोत व इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला की, “विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील आणि शिक्षक जे सांगतात ते सर्व ऐकले व समजून घेतले, तर ते भविष्यात निश्चितच देशाचे आदर्श नागरिक बनतील.” तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी विद्यार्थ्यांना “शिक्षणासोबतच जीवनात चांगले संस्कार, कडक शिस्त आणि आपल्या जबाबदारीचे भान असणे किती महत्त्वाचे आहे,” हे सोप्या शब्दांत पटवून दिले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!