निगडीतील ऐतिहासिक ‘अप्पु घर’ आता नव्या आणि अत्याधुनिक रूपात; १८.६० कोटींच्या गुंतवणुकीतून होणार कायापालट!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: गेल्या ३५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या आणि बालगोपाळांच्या आवडीचे केंद्र असलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ (Appu Ghar) अम्युझमेंट पार्क आता नव्या, अत्याधुनिक व थरारक रूपात सजणार आहे. तब्बल १८ कोटी ६० लाख रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून या पार्कचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार असून, यासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी उपसूचनेसह मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुने मनोरंजनालय म्हणून ‘अप्पु घर’ ओळखले जाते. मात्र, काळाच्या ओघात येथील बहुतांश राईड्स २० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या होत्या. जीर्ण यंत्रसामग्री आणि नव्या तंत्रज्ञानाचा अभाव यांमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होऊन पालिकेच्या महसुलावर परिणाम होत होता. बाजारातील नव्या पर्यटन स्थळांशी स्पर्धा करण्यासाठी या पार्कचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज बनले होते.
कोरोना काळात (१६ मार्च २०२० ते जानेवारी २०२२) ‘अप्पु घर’ पूर्णपणे बंद ठेवावे लागले होते. या काळात चालकाला झालेले आर्थिक नुकसान विचारात घेऊन, अटी-शर्तीनुसार भाडेदरात वाढ करत मूळ करार संपल्यानंतर अतिरिक्त २ वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
मे. पुष्पक अम्युझमेंट यांच्या माध्यमातून १८ कोटी ६० लाखांची गुंतवणूक करून पुढील १२ ते १८ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. लॉग फ्ल्युम (पाण्यावरील घसरगुंडी), फ्लाईंग सिनेमा, ३६०° इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेझ व इन्फिनिटी टनल, नायगारा कृत्रिम धबधबा, किड्स ट्रॅफिक पार्क, आर्केड गेम्स, एआर-व्हीआर (AR-VR) झोन आणि इंटरॅक्टिव्ह सेल्फी झोन. पार्कचे ‘नेचर थीम’ व ‘किड्स थीम’वर आधारित सुशोभीकरण, डिजिटल तिकीट प्रणाली, क्यू मॅनेजमेंट, स्मार्ट पार्किंग आणि modern फूड कोर्ट. फायर सेफ्टी, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, स्ट्रक्चरल सेफ्टी, अतिथी विमा (Guest Insurance) आणि सार्वजनिक दायित्व विमा अनिवार्य करण्यात आला आहे. या करारानुसार महापालिकेला पहिल्या वर्षी १०% आणि त्यानंतर दरवर्षी ५% वार्षिक भाडेवाढ मिळणार आहे.
“या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये मोठी भर पडणार आहे. आजच्या नव्या पिढीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन शहरातच उपलब्ध होईल. तसेच, या आधुनिकीकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळेल.”
— अभिषेक बारणे, सभापती (स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
