news
Home पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर येथे पवना नदीपात्रात भूमाफियांचा उच्छाद! राडारोडा टाकून उभारली बेकायदेशीर पत्राशेड

पिंपळे सौदागर येथे पवना नदीपात्रात भूमाफियांचा उच्छाद! राडारोडा टाकून उभारली बेकायदेशीर पत्राशेड

मनपा पर्यावरण विभाग आणि सत्ताधारी भाजपवर अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड कडाडले; २४ तासांत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा मनपा प्रशासनाला इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पवना नदीपात्र गिळंकृत करण्याचा भूमाफियांचा डाव! पिंपळे सौदागर पुलाजवळ राडारोडा टाकून पत्राशेडचे साम्राज्य; मनपा पर्यावरण विभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षावर प्रदीप गायकवाड आक्रमक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पिंपळे सौदागर येथील पुलावरून पिंपरीकडे जाताना पवना नदीकिनारी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने रात्री-अपरात्री शेकडो ट्रक राडारोडा (डेब्रिज) आणि भंगार माल टाकला जात आहे. या राडारोड्याचे सपाटीकरण करून चक्क नदीपात्रात नवी जमीन तयार केली जात असून, तेथे बेकायदेशीर पत्राशेड उभारून अवाढव्य व्यावसायिक गाळे सुरू करण्यात आले आहेत. यामुळे नदीचे नैसर्गिक पात्र अत्यंत अरुंद झाले असून पावसाळ्यात पिंपळे सौदागर आणि पिंपरी परिसराला पुराचा मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकाराकडे महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी हे केवळ ‘अर्थपूर्ण’ विचाराने डोळेझाक करत आहेत,” असा थेट आणि जळजळीत आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केला आहे.

या संदर्भात प्रदीप गायकवाड यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार करून नदीपात्रातील अतिक्रमणांवर तात्काळ बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 

प्रदीप गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शहरातील नद्यांच्या दुरवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “हा केवळ पिंपळे सौदागर पुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नद्यांच्या पात्रात आज राजरोसपणे राडारोडा टाकून भूखंड हडप करण्याचे सत्र सुरू आहे. नदीच्या पूररेषेच्या (Blue Line) आत कोणत्याही प्रकारचे पक्के किंवा तात्पुरते बांधकाम करण्यास कायद्याने कडक बंदी आहे. मात्र, भूमाफिया आणि मनपाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे या कायद्याला केराची टोपली दाखवली गेली आहे. नदीपात्रात भंगार आणि राडारोडा टाकल्यामुळे नद्यांचे नैसर्गिक प्रदूषण वाढले असून येथील जलचर प्राणी आणि नदीकाठची समृद्ध जैवविविधता पूर्णपणे नष्ट झाली आहे.”

गायकवाड यांनी मनपाच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “नद्यांचे संवर्धन करणे आणि पर्यावरण जपण्याची ज्यांच्या खांद्यावर कायदेशीर जबाबदारी आहे, त्या पर्यावरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांना या भीषण ऱ्हासाशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. नदीकाठच्या जैवविविधतेचा खून होत असताना कुलकर्णी साहेब केबिनच्या बाहेर पडायला तयार नाहीत. या मागे केवळ आणि केवळ ‘मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचा’ संशय येत आहे. जर एखादा सामान्य नागरिक घराचे छोटेसे काम करत असेल तर तात्काळ धावून जाणारे मनपाचे पथक नदीपात्र बुजवून पत्राशेड उभारणाऱ्या बड्या भूमाफियांवर कारवाई का करत नाही? हे संशयास्पद आहे.”

शहरातील राजकीय व्यवस्थेवर आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर प्रहार करताना प्रदीप गायकवाड म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सत्ताधारी भाजपचे या मनपा प्रशासनावर आणि विशेषतः कुलकर्णी साहेबांपुढे काहीही चालत नाही, हीच या शहराची सर्वात मोठी शोकांतिका आहे. जर सत्ताधारी पक्षच अधिकाऱ्यांपुढे नतमस्तक झाला असेल, तर शहरातील सामान्य नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची? अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज पिंपरी-चिंचवड बकाल शहराकडे वाटचाल करत आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने महापालिका प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, पिंपळे सौदागर येथील पवना नदीपात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकून तयार करण्यात आलेली बेकायदेशीर पत्राशेड व व्यवसाय २४ तासांच्या आत निष्कासित करावेत. तसेच संपूर्ण पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील भरावाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा नदी संवर्धनासाठी आणि शहरातील पर्यावरण रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.

आपला विश्वासू, प्रदीप गायकवाड शहराध्यक्ष, अर्बन सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट), पिंपरी-चिंचवड.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!