रावेत उर्फ ‘दुबई’ की कचऱ्याचे साम्राज्य? फुलजाई चौकात पाणी गळती अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिक त्रस्त; ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत मुठाळ यांनी पाहणी करण्याची प्रदीप गायकवाड यांची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
रावेत: “रावेत परिसरामध्ये गृहप्रकल्प उभारणारे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना सदनिका विक्री करताना ‘रावेत आता दुबईकडे वाटचाल करीत आहे’ अशा टोलेजंग जाहिराती करतात. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवरची वस्तुस्थिती अत्यंत भीषण आणि बकाल आहे. रावेतमध्ये ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, धुळीचे साम्राज्य, पदपथावरचे निखळलेले सिमेंटचे गट्टू, गतिरोधकांचा अभाव आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातच पाण्याचा महत्त्वाचा व्हॉल्व्ह गळत असून त्याभोवती कचरा डेपो तयार झाला आहे. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केवळ एसी कार्यालयात न बसता रावेतचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, तेव्हाच येथील खरी बकाल परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल,” असा तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी प्रशासनाला घरघर लावली आहे.
रावेत येथील अत्यंत गजबजलेल्या शिंदे वस्तीमधील फुलजाई चौकात महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोखंडी जाळी टाकली आहे. या जाळीच्या खालून महापालिकेची मुख्य पाण्याची पाईपलाईन गेली असून, याच ठिकाणी पाण्याचा मुख्य व्हॉल्व्ह (Water Valve) देखील आहे. गेल्या तीन दिवसांपासून या महत्त्वाच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू आहे.
पाण्याचा हा अपव्यय सुरू असतानाच, स्थानिक दुकानदार, पथारी व्यावसायिक, हातगाडीवाले आणि काही बेशिस्त नागरिक स्वतःच्या दुकानातील व घरातील कचरा थेट या लोखंडी जाळीवर आणि आजूबाजूला टाकत आहेत. यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी सुटली आहे. शुद्ध पाण्याच्या पाईपलाईनजवळच साचलेल्या या कचऱ्यामुळे परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रदीप गायकवाड यांनी रावेतच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना सांगितले की, “येथील अंतर्गत रस्ते केवळ आश्वासनांच्या गाजरांवर अडकले आहेत. रस्ते डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणाची कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना आणि पादचाऱ्यांना चालणे असह्य झाले आहे. पदपथावरील सिमेंटचे गट्टू उखडले असून गतिरोधक नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. येत्या पावसाळ्यात या उखडलेल्या रस्त्यांवर चिखल आणि पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार आहेत. अशा विचित्र परिस्थितीमुळे रावेतला ‘दुबई’ म्हणणे म्हणजे स्थानिक नागरिकांची चेष्टा करण्यासारखे आहे.”
या अत्यंत गंभीर समस्येची दखल घेऊन स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी मनपाचे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत मुठाळ यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
गायकवाड म्हणाले, “माझी मुठाळ साहेबांना कळकळीची विनंती आणि मागणी आहे की, त्यांनी स्वतः रावेतच्या या बकाल भागांची प्रत्यक्ष पाहणी करावी. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच त्यांना एसी केबिनच्या बाहेरची खरी परिस्थिती समजेल. प्रशासनाने तात्काळ फुलजाई चौकातील पाणी गळती थांबवून तिथला कचरा हटवावा आणि रावेतच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी प्राधान्याने पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
आपला विश्वासू, प्रदीप गायकवाड शहराध्यक्ष, अर्बन सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मा. अजितदादा पवार गट), पिंपरी-चिंचवड.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
