“भविष्यात भारतामध्ये ‘एआय’ क्षेत्रात गुंतवणुकीची आणि रोजगाराची मोठी लाट!” – करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर
पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: “आज जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) बाबत मोठी उत्सुकता आणि काही प्रमाणात भीतीचे वातावरण असले, तरी भविष्यात ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. संगणक आणि मोबाईल ज्याप्रमाणे आपण सहजपणे स्वीकारले, तसेच एआय देखील आपल्या अंगवळणी पडेल. भारत देश सध्या एआयच्या वापरामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयटी कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित अफाट सेवा भारतात सर्वाधिक असल्याने, पुढील काळात एआयशी संबंधित सर्वात जास्त रोजगार आणि गुंतवणूक आपल्या भारत देशातच होईल,” अशी खात्रीशीर अपेक्षा प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली.
पुण्यातील ‘ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स’ आणि रायगड येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ (बाटु) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘करिअर मार्गदर्शन मेळाव्यात’ प्रमुख वक्ते म्हणून विवेक वेलणकर बोलत होते.
याप्रसंगी बाटुचे कुलसचिव डॉ. अमित शेष, ॲस्पायर नॉलेजचे संस्थापक व सीईओ डॉ. संजय गांधी, आयआयटी वाराणसीचे डॉ. शैलेंद्र शुक्ला, रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे उपव्यवस्थापक मंदार हलभावी, प्रख्यात उद्योजक मनोज देशमुख आणि प्रशांत पुंड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

विवेक वेलणकर यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराचा वेध घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “शिक्षण, शेती, उद्योग, सेवा, वैद्यकीय, वाणिज्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचा वापर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामुळे केवळ पारंपारिक कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. मात्र, एआयचे टूल्स विकसित करणारे आणि मशीन लर्निंग (ML) साठी काम करणाऱ्या तज्ज्ञांना बाजारात प्रचंड मागणी असेल. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना कॅम्पस प्लेसमेंट आणि प्रत्यक्ष इंटर्नशिपला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. यासाठी ‘ॲस्पायर नॉलेज’ ही संस्था एक उत्तम आणि सक्षम पर्याय आहे.”
बाटु विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अमित शेष यांनी विद्यापीठाच्या धोरणांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने पुण्याच्या ‘ॲस्पायर नॉलेज’ संस्थेसोबत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग’ या विषयात ‘बीएससी (ऑनर्स)’ हा अभिनव पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. याशिवाय विद्यापीठाने ‘ट्रिपल आयटी, अलाहाबाद’ सारख्या राष्ट्रीय संस्थेसोबतही करार केले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता प्रत्यक्ष उद्योगांचा अनुभव मिळावा, यासाठी विद्यापीठ सातत्याने समन्वय साधत आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ९२ यशस्वी स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. तसेच ‘नॅशनल इंक्युबेशन स्टार्टअप पॉलिसी’ (NISP) अंतर्गत विद्यापीठाने दरवर्षी २५ लाख रुपयांचा विशेष निधी राखीव ठेवला असून विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा.”
स्वागत आणि प्रास्ताविक करताना ‘ॲस्पायर नॉलेज’चे संस्थापक व सीईओ डॉ. संजय गांधी यांनी नवीन अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “पुण्यातील आमची संस्था केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP) नुसार कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त स्टार्टअप्सना यशस्वी मार्गदर्शन केले आहे. बाटु विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू होणारा हा ४ वर्षांचा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीएससी (ऑनर्स)’ अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी विभागात सुरू करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना एआय सोबतच अत्याधुनिक ‘क्वांटम कॉम्प्युटर’चे विशेष ज्ञान मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना थेट उद्योगांमध्ये काम करण्याचा अनुभव (इंटर्नशिप) दिला जाईल, ज्यामध्ये त्यांना आकर्षक स्टायपेंड (मानधन) आणि अनुभवाचे प्रमाणपत्रही मिळेल. हा १२ अधिक ४ वर्षांचा शैक्षणिक पॅटर्न परदेशातील उच्च शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”
सदर कार्यक्रमाचे अत्यंत नेटके व बहारदार सूत्रसंचालन समिधा गांधी यांनी केले, तर उपस्थितांचे मनःपूर्वक आभार अमित गांधी यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

