news
Home पिंपरी चिंचवड धरणाच्या पाण्याखालील १०० फूट खोल बोगद्यात उतरून आयुक्तांनी घेतला आढावा; शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाचा मोठा पुढाकार

धरणाच्या पाण्याखालील १०० फूट खोल बोगद्यात उतरून आयुक्तांनी घेतला आढावा; शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाचा मोठा पुढाकार

१६७ द. ल. लि. पाणी कोटा शहराला मिळणार; गुणवत्ता अन् सुरक्षिततेशी तडजोड न करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेली सर्व कामे दर्जा, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची कोणतीही तडजोड न करता विहित मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून ६०.७९ द. ल. घ. मी. (१६७ द. ल. लि. प्रतिदिन) इतका पाणी कोटा आरक्षणास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत धरणातून शहरात पाणी आणण्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळाला भेट दिली.

या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपअभियंता दिनेश फाटक, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांच्यासह संबंधित कामांचे ठेकेदार व सल्लागार उपस्थित होते.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत चाललेल्या विविध महत्त्वाच्या टप्प्यांची पाहणी केली.  भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील बी.पी.टी. पर्यंत १७०० मि.मी. व्यासाची उदंचन नलिका टाकण्याचे काम. नवलाख उंबरे बी.पी.टी. ते देहूपर्यंत १४०० मि.मी. व्यासाची गुरुत्व नलिका टाकणे. भामा आसखेड धरण येथील जॅकवेलच्या बांधकामाची पाहणी करताना त्यांनी धरणाच्या पाण्याखालील तब्बल १०० फूट खोल बोगद्याची (Intake Tunnel) प्रत्यक्ष उतरून पाहणी केली. सर्व कामांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी, सल्लागार आणि ठेकेदारांना कडक सूचना दिल्या.

“पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतील सर्व कामांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेची कोणतीही तडजोड न करता उर्वरित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शहराला नियोजित वेळेत या योजनेचा लाभ उपलब्ध होईल, यासाठी आम्ही प्रशासकीय स्तरावर पूर्ण ताकदीने प्रयत्नशील आहोत.”

डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!