news
Home पिंपरी चिंचवड ४५ कोटींचा रस्ता दीड वर्षात खड्ड्यात; ठेकेदारावर गुन्हा दाखल करून वसुली करण्याची ठाम मागणी

४५ कोटींचा रस्ता दीड वर्षात खड्ड्यात; ठेकेदारावर गुन्हा दाखल करून वसुली करण्याची ठाम मागणी

निगडी बसस्टॉप तातडीने भक्ती-शक्ती उद्यानासमोर हलवा; महापालिका अन् मेट्रो प्रशासनाच्या दुर्लक्षावर सचिन काळभोर यांचा घणाघात | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजप कार्यकर्त्याचाच स्वपक्षीय कारभारावर हल्लाबोल! निगडी-आकुर्डी रस्त्यावरील खड्ड्यांवरून भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा पालिकेला ‘घरचा आहेर’!

पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा आणि सत्ताधाऱ्यांचा कोणताही वचक उरलेला नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि महामार्गावरील भीषण खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या सर्व अनागोंदी कारभारावरून भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनीच थेट पालिका प्रशासन आणि महापालिकेतील आपल्याच पक्षाच्या कारभाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत ‘घरचा आहेर’ दिला आहे.

निगडी ते पिंपरी दरम्यान मेट्रो रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी निगडी, मुंबई-पुणे महामार्गावरील भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते निगडी बसस्टॉप दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे. यामुळे मुळातच महामार्गावरील रस्ता प्रचंड अरुंद झाला आहे. त्यातच या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि रोज भीषण अपघात घडत आहेत.

निगडी बसस्टॉप येथे हजारो प्रवाशांची दैनंदिन मोठी रहदारी असते. बसस्टॉपमुळे या ठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याने हा निगडी बसस्टॉप ‘भक्ती-शक्ती उद्याना’ समोर हलवण्यात यावा, अशी वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मेट्रो प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर आणि PMPML बस ट्रान्सपोर्ट व्यवस्थापन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अवघ्या दीड वर्षापूर्वी निगडी ते आकुर्डी दरम्यानच्या रस्त्याचे ‘अर्बन स्ट्रीट’ योजनेअंतर्गत तब्बल ४५ कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रिटीकरण केले होते. मात्र, अवघ्या दीड वर्षातच या ४५ कोटींच्या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. निगडी बसस्टॉप, आकुर्डी सिग्नल तसेच बजाज ऑटो कंपनीसमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

त्यामुळे करदात्या सामान्य नागरिकांच्या पैशांची झालेली ही उधळपट्टी थांबवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी. संबंधित ठेकेदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि रस्त्यासाठी खर्च केलेले ४५ कोटी रुपये ठेकेदाराकडून वसूल करावेत, अशी ठाम मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असूनही भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि प्रशासन नागरिकांच्या या मरणासन्न यातनांकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वपक्षीय कार्यकर्त्यालाच आता रस्त्यावर उतरून आपल्याच सरकारला आणि पालिकेला जागे करण्यासाठी इशारा द्यावा लागत असल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची प्रशासनावरील पकड पूर्णपणे सुटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!