पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा उद्यापासून प्रारंभ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘घर घर संविधान’ हा अभिनव उपक्रम आज, दि. १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ११:०० वाजता वाल्हेकरवाडी येथील महापालिका शाळेत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये दररोज संविधानातील एका कलमाचे वाचन आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी साक्षरता व जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
-
विविध उपक्रम: संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, मूलभूत अधिकार व कर्तव्यांविषयी जनजागृती आणि संविधान मूल्यांवर आधारित विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
-
नूर खान पठाण यांचे प्रशिक्षण: ‘मानगाव पॅटर्न’चे प्रमुख संविधान अभ्यासक नूर खान पठाण हे शिक्षकांना विनामूल्य मार्गदर्शन करणार असून, संविधानातील विविध कलमे विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणार आहेत.
-
समन्वय समिती: उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने समन्वय समिती स्थापन केली आहे. सर्व शाळांना उपक्रमाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“भारतीय संविधान ही आपल्या लोकशाहीची पायाभरणी आहे. लहान वयापासून संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे. ‘घर घर संविधान’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होईल.”
— रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका)
“विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्याचा हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरेल. शिक्षणासोबत सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरेल.”
— रविना आंगोळकर (सभापती, शिक्षण समिती)
“समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम प्रभावीपणे राबवून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाचा विचार आणि लोकशाही मूल्ये पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
