पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारा; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ऑटो क्लस्टर समोर नवीन मुख्य प्रशासकीय इमारत उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या नव्या प्रशासकीय मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा बसवण्यात यावा, अशी आग्रही मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी एका निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात मारुती भापकर यांनी महापालिकेचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांना रीतसर निवेदन पाठवून कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे.
निवेदनात मारुती भापकर यांनी नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच पालिकेच्या अधिकृत मुद्रेवर (Logo) छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्यामुळे नवीन मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे हा संपूर्ण शहराच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांना समान न्याय, कडक शिस्त, कायद्याची जरब, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावणारा पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि महिलांचा सन्मान हे विचार आजही प्रशासनासाठी मार्गदर्शक आहेत. नव्या मुख्यालयात महाराजांचा पुतळा असल्यास, तेथे काम करताना लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराजांच्या आदर्शांची सदैव आठवण राहील.”
— मारुती भापकर (सामाजिक कार्यकर्ते)
नवीन मुख्यालयातील प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व नम्र मुजरा करूनच व्हावा, अशी संकल्पनाही या निवेदनात मांडण्यात आली आहे.
हा अत्यंत महत्त्वाचा व अस्मितेचा विषय गांभीर्याने घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी व प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या परवानग्या मिळवून हे ऐतिहासिक काम आपल्याच कार्यकाळात पूर्ण करावे, अशी आग्रही विनंतीही मारुती भापकर यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

