निगडी पोलिसांची धडक कारवाई: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी!
पिंपरी, प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान दि. ३१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पिंपरी-चिंचवड विशेष (पोक्सो) न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. आरोपी मोहन चिनप्पा उर्फ केंचप्पा कुन्हाडे (वय ३३ वर्षे, रा. अजंठानगर, चिंचवड) यास न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी आणि २५,००० रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. मा. विशेष (पोक्सो) न्यायाधीश श्रीमती संध्या नायर यांनी दि. २८ जुलै २०२६ रोजी हा निकाल दिला.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२० अन्वये भा.दं.वि. कलम ३७६ सह ५११, ३५४(ब), ३२३, ५०६ तसेच पोक्सो कायदा (POCSO) कलम ४ सह १८, ७, ८, ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्यानंतर निगडी पोलिसांनी तात्काळ वेगाने सूत्रे हलवून गुन्हा दाखल केला आणि सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत भक्कम पुरावे गोळा केले, ज्यामध्ये पीडितेचा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे (Medical Evidence), घटनास्थळ पंचनामा व इतर कायदेशीर दस्तऐवज, हे सर्व पुरावे न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यात आले. अभियोजन पक्षाचा युक्तिवाद आणि ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली.
सदर गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक व्हि. व्हि. घाटे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात विशेष सरकारी अभियोक्ता श्री. पी. एस. अग्रवाल यांनी प्रभावी युक्तिवाद करत शासनाची बाजू भक्कमपणे मांडली. तसेच, निगडी पोलीस स्टेशनतर्फे पैरवी अधिकारी म्हणून ग्रेड पोउनि गोविंद मरभळ आणि पोशि/१५२८ अनिल जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्री. संदीप आटोळे, आणि सह. पोलीस आयुक्त श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन घोडेपाटील व सहायक पोलीस निरीक्षक राहुल गौधे यांनी कोर्ट कामकाजाचे यशस्वी नियोजन केले.
“महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही घटना निदर्शनास आल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”
— संदीप आटोळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, पिंपरी चिंचवड)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
