news
Home पुणे परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका; अपयश हीच यशाची पहिली पायरी असल्याचा दिला मंत्र

परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका; अपयश हीच यशाची पहिली पायरी असल्याचा दिला मंत्र

अनाथ अन् निराश्रित मुलांच्या दाखल्यांचा प्रश्न सुटणार; पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“मोठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा”; जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे यांनी उलगडला बालगृहातील मुलींसमोर जीवनप्रवास!

पुणे/पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले दि. ३१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: “मुलींनो, मी माझेच उदाहरण तुम्हाला देतो… मी आठवी-नवीत शिकत असताना आमच्या शेतात जाण्याचा रस्ता बसस्थानकावरून जात असे. तिथून लाल दिव्याची एक गाडी जाताना दिसायची. ती कलेक्टरची गाडी असल्याचे बाबांनी सांगितले आणि त्याच क्षणी माझ्या मनात कलेक्टर होण्याचे स्वप्न निर्माण झाले. दुर्दैवाने कलेक्टर-आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण जिद्द सोडली नाही. त्याच चिकाटीमुळे आज मला जिल्हा सत्र न्यायाधीश या सर्वोच्च सांविधानिक पदावर सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका,” अशा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी शब्दांत पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वानखेडे यांनी बालगृहातील विद्यार्थिनींसमोर आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडला.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण येथील ‘ममता बाल सदन’ (बालगृह) येथे आयोजित “गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात” ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातून सुरू झालेला त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर भारावून गेले.

या सोहळ्यात शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा न्या. अरविंद वानखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बालगृहातील मुलींशी आपुलकीने संवाद साधताना त्यांनी सांगितले, “तुमच्यापैकी अनेक मुली उद्या न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर किंवा समाजसेविका होऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शिक्षणाला कधीही सोडू नका. ‘मोठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा’.” तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध जनजागृती उपक्रम राबवले जात असून, माईंच्या (सिंधुताई सपकाळ) संस्थेला भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा. रेवती देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. माईंच्या विचारांचा आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा तुमच्याकडे आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला निश्चितच यश मिळवून देतील.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक (दादा) गायकवाड होते. यावेळी सासवडचे दिवाणी न्यायाधीश टी. पी. मोटे, द्वितीय सह न्यायाधीश आर. ए. सावंत, सह न्यायाधीश एस. जी. सावंत, ममताताई सपकाळ, विनय सपकाळ, अनिल कुडीया आदी मान्यवर उपस्थित होते.

अनाथ, निराधार आणि निराश्रित मुलांकडे आधार कार्ड, जन्मदाखला किंवा जातीचा दाखला नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, असा गंभीर प्रश्न अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी मांडला. याची तातडीने दखल घेत, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वानखेडे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे सर्व दाखले मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. या निर्णयामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!