news
Home पिंपरी चिंचवड पूरप्रवण परिसर, नाले अन् सखल भागांवर विशेष नजर; आपत्कालीन मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पूरप्रवण परिसर, नाले अन् सखल भागांवर विशेष नजर; आपत्कालीन मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिका यंत्रणा पूर्णपणे सतर्क; सर्व विभागांना २४ तास सज्ज राहण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पुणे जिल्ह्यात दिवसभर मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह सर्व संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने सज्ज राहावे, असे कडक निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

शहरात पावसाचा जोर वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, जलनिस्सारण व्यवस्थेवर ताण येणे आणि वाहतूक कोंडी उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन पथके, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणी साचण्याची शक्यता असलेले रस्ते, नाले, पूल, उड्डाणपूल, सखल भाग आणि पूरप्रवण परिसराची सातत्याने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, विद्युत, जलनिस्सारण व स्थापत्य या सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून २४ तास सज्ज राहावे. पाणी उपसा करण्यासाठी पंपिंग मशिन्स, बचाव साहित्य आणि आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे, वाहणारे पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करणे किंवा धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे.

कोणतीही आपत्कालीन घटना, झाड पडणे किंवा पाणी साचल्यास नागरिकांनी महापालिकेच्या  क्रमांकांवर संपर्क साधावा.  महापालिका मुख्य नियंत्रण कक्ष: ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११,  अग्निशमन विभाग: ७०३०९०८९९१

“भारतीय हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि संबंधित यंत्रणांना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भाग, पूरप्रवण परिसर, नाले, पूल तसेच संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महापालिका परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.”

डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!