निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या दारातच भटक्या कुत्र्यांचा उच्छाद! नागरिक अन् महिलांचा जीव मुठीत; मनपा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
निगडी: “पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचे दावे करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आता थेट त्यांच्या स्वतःच्याच उंबरठ्यावर उघडा पडला आहे. निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच सध्या भटक्या कुत्र्यांनी प्रचंड उच्छाद मांडला असून, मुख्य दारातच कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. विविध कामांनिमित्त कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या सामान्य नागरिकांना, महिलांना आणि वृद्धांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. स्वतःच्या कार्यालयाच्या दारातील कुत्रे हटवू न शकणारा महापालिकेचा आरोग्य विभाग संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न काय सोडवणार?” असा संतप्त सवाल करत भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
या संदर्भात सचिन काळभोर यांनी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित आरोग्य अधिकारी आणि तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे.

निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हे अत्यंत गजबजलेले प्रशासकीय केंद्र आहे. या ठिकाणी जन्म-मृत्यू दाखले, कर संकलन, स्वच्छता विभाग आणि विविध नागरी कामांसाठी दररोज हजारो नागरिक येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या अगदी बाहेर ६ ते ७ हिंस्त्र आणि भटक्या कुत्र्यांनी आपला कायमचा डेरा मांडला आहे.
कार्यालयात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना हे कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून जातात, ज्यामुळे महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकदा कुत्र्यांच्या भीतीने नागरिक कार्यालयात आत जाण्यासही धजावत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करते. परंतु, ज्या कार्यालयात स्वतः क्षेत्रीय अधिकारी आणि आरोग्य अधिकारी बसतात, त्याच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील कुत्र्यांकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
“महापालिकेचे सुरक्षा रक्षक नेमके काय काम करतात? मुख्य दारावर सुरक्षेसाठी तैनात असलेले कर्मचारी या भटक्या प्राण्यांना हुसकावून लावण्याचे साधे कर्तव्यही पार पाडत नाहीत का?” असा थेट प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या सुरक्षा आणि आरोग्य विभागाची नाचक्की झाली आहे.
या भीषण समस्येवर संताप व्यक्त करताना भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर म्हणाले, “हा अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणा प्रकार आहे. ज्या ठिकाणी सामान्य जनता आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे येते, तिथेच जर लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर नागरिक दाद कोणाकडे मागणार? महापालिकेच्या मुख्य दारावर सुरक्षेचा आणि आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. माझी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे आग्रही मागणी आहे की, त्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यावर आणि मुख्य दारावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तरच या सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग येईल.”
जर पुढील २४ तासांत या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित वातावरण दिले नाही, तर ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सचिन काळभोर यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
