news
Home अमरावती अमरावती विभागात अवैध दारूमाफियांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वज्रप्रहार! १५ दिवसांत ५४४ गुन्हेगारांना बेड्या

अमरावती विभागात अवैध दारूमाफियांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वज्रप्रहार! १५ दिवसांत ५४४ गुन्हेगारांना बेड्या

६६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; उपायुक्त डॉ. पराग नवलकर थेट कारवाईच्या मैदानात, माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्याच्या दुर्घटनेनंतर अमरावती विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! १५ दिवसांत ५९० गुन्हे दाखल, ५४४ आरोपी गजाआड

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: पुणे जिल्ह्यात घडलेल्या मिथेनॉल मिश्रित विषारी दारूच्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती विभागामध्ये हातभट्टी व गावठी दारूची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वज्रप्रहार केला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या थेट आदेशानुसार संपूर्ण अमरावती विभागात धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत विभागाने केवळ १५ दिवसांत (२९ मे ते १४ जून २०२६) तब्बल ५९० गुन्हे दाखल करून ५४४ गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण कारवाईत तब्बल ६६ लाख ३६ हजार ११५ रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या विशेष मोहिमेमध्ये विभागातील पाचही जिल्हे आणि विभागीय भरारी पथकाने अत्यंत वेगाने धाडी टाकून दारूमाफियांची पाळेमुळे उखडून टाकली आहेत. जिल्हावार कारवाईची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

जिल्हा / विभाग नोंदवलेले गुन्हे अटक केलेले आरोपी जप्त केलेली देशी दारू (ब.लि.) जप्त हातभट्टी दारू (ब.लि.) जप्त केलेले रसायन (ब.लि.) जप्त केलेली वाहने एकूण जप्त मुद्देमाल (रु.)
अमरावती १७९ १७३ १८८.६४ ४,०५९.०६ २१,८१५ १६,९३,८९५/-
अकोला ८३ ८५ ३९७.७० ३४०.०० ४,३२४ ६,२४,७९५/-
यवतमाळ १२८ ११२ १४३.९९ १,३२७.०० ३२,२६० १५,०६,२९५/-
बुलढाणा ११० १०८ ३०६.६७ ३,७८८.०० २५,०७२ १४,६८,४४५/-
वाशिम ५१ ४२ ६३.८८ १,३२७.०० १७,०३० ७,९१,४६०/-
विभागीय भरारी पथक ३९ २४ ९६.०२ ३०७.०० १०,१८५ ५,५१,२२५/-
एकूण कामगिरी ५९० ५४४ १,१९६.९० १०,३६१.०६ १,१०,६८६ १२ ६६,३६,११५/-

या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अमरावती विभागाचे उपायुक्त डॉ. पराग नवलकर यांनी केवळ कार्यालयात न बसता स्वतः थेट घटनास्थळी जाऊन कारवाईत सहभाग घेतला. ३१ मे आणि १ जून रोजी अमरावतीचे अधीक्षक शशिकांत गर्जे, विभागीय भरारी पथक आणि कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. तर ५ जून रोजी यवतमाळचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्या सोबतही त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकले.

या महामोहिमेत अमरावतीचे अधीक्षक शशिकांत गर्जे, अकोल्याच्या अधीक्षक श्रीमती सीमा झावरे, यवतमाळचे अधीक्षक नितेश शेंडे आणि बुलढाण्याचे अधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि जवानांनी अहोरात्र कष्ट घेऊन ही कामगिरी बजावली.

या धडक कारवाईनंतर बोलताना विभागीय उपायुक्त डॉ. पराग नवलकर यांनी अवैध दारू विक्रेत्यांना गंभीर इशारा दिला. ते म्हणाले, “अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचा धंदा करणाऱ्यांवर आम्ही अत्यंत कडक पावले उचलली आहेत. हा केवळ १५ दिवसांचा उपक्रम नसून ही मोहीम अविरत सुरू राहील. यापुढे विभागात कोणत्याही प्रकारच्या अवैध दारू निर्मितीला, वाहतुकीला आणि विक्रीला थारा दिला जाणार नाही. जे कोणी यामध्ये आढळतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.”

अमरावती विभागामध्ये कुठेही हॉटेल्स, ढाबे, शेतशिवारे किंवा इतर कोणत्याही गुप्त ठिकाणी अवैध मद्यविक्री, वाहतूक किंवा हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिक खालील अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार किंवा माहिती नोंदवू शकतात:

  • टोल फ्री क्रमांक: १८००२३३९९९९ (18002339999)
  • व्हॉट्सॲप क्रमांक: ८४२२००११३३ (8422001133)
  • अधिकृत संकेतस्थळ: excisesuvidha.mahaonline.gov.in

माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि त्यांची ओळख पूर्णपणे ‘गोपनीय’ ठेवली जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!