स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊंना पिंपरी-चिंचवडमध्ये कष्टकऱ्यांचे भावपूर्ण अभिवादन! थरमॅक्स चौकात जिजाऊंच्या विचारांनी पेटली सामाजिक बांधिलकीची मशाल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत, अथांग जिद्दीचे व दूरदृष्टीच्या नेतृत्वाचे जिवंत प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवून त्यांना सुसंस्कार व राष्ट्रभक्तीची अमूल्य शिदोरी देणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे कामगार व कष्टकऱ्यांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाच्या वतीने या संयुक्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक आदरांजली वाहून त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अभूतपूर्व योगदानाला अत्यंत कृतज्ञतापूर्वक नमन करण्यात आले.
अभिवादन सभेला संबोधित करताना कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले, “राजमाता जिजाऊ यांनी केवळ एका राजपुत्राला जन्म दिला नाही, तर त्यांनी या देशातील रयतेला स्वतःचे स्वराज्य मिळवून देणारा युगप्रवर्तक नेता घडवला. त्यांनी शिवरायांना दिलेले शौर्य, न्यायप्रियता, समता आणि लोककल्याणाचे संस्कार आजही आपल्या समाजव्यवस्थेचा पाया आहेत. आज जेव्हा आपण त्यांचा स्मृतिदिन साजरा करतो, तेव्हा केवळ हार अर्पण करून चालणार नाही. तर त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी जे समतावादी विचार रुजवले, त्या विचारांवर चालून समाजातील शेवटच्या कष्टकरी, फेरीवाला, कामगार आणि उपेक्षित घटकाला त्याचा हक्क मिळवून देणे, हीच त्यांना खरी आणि मानाची आदरांजली ठरेल.”
स्मृतिदिनाच्या निमित्ताने थरमॅक्स चौकात जमलेल्या शेकडो कामगार बांधवांनी आणि महिला भगिनींनी राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत एक महत्त्वपूर्ण सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यामध्ये शहरातील कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणे, सामाजिक सलोखा राखणे, एकमेकांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि गरिबांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणे या मूल्यांचा स्वीकार करण्याचा संकल्प करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्यादरम्यान कामगारांच्या चेहऱ्यावर आपल्या राष्ट्रमातेबद्दल असलेला निस्सीम आदर आणि स्वाभिमान ओसंडून वाहत होता.
या जाहीर अभिवादन सोहळ्याला पिंपरी-चिंचवडमधील विविध कामगार संघटनांचे प्रमुख नेते, महिला प्रतिनिधी आणि शेकडो कष्टकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासोबत उपाध्यक्ष राजेश माने, मंगेश पालके, सुनील भोसले, मनीषा चौधरी, गंगाबाई बिरादार, पूनम जैसवार, ज्योती साबळे, ज्योती शिंदे, वैशाली साळुंके, ताई कुसाळकर, निर्मला टोणपे, सुजाता कांबळे आणि सुजाता फलके यांच्यासह रिक्षा-टॅक्सी चालक संघटनेचे प्रतिनिधी, पथविक्रेते (फेरीवाले) आणि सामान्य कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे अत्यंत चोख नियोजन आणि आभार प्रदर्शन कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
