मोशी कचरा डेपो दुर्घटना: ‘अँटोनी लारा’ कंपनीच्या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल! पालिका अधिकाऱ्याची पोलिसांत मोठी फिर्याद
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो येथील भीषण दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांचा बळी गेल्यानंतर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या आदेशानुसार, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) सोहन निकम यांनी दिलेल्या सविस्तर फिर्यादीवरून एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदार कंपनी ‘अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.’ च्या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा (भारतीय न्याय संहिता) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसाळ्यापूर्वी कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याची (SLF – Sanitary Landfill) आवश्यक सुरक्षितता तपासणी आणि उपाययोजना करण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा थेट ठपका या एफआयआरमध्ये (FIR) ठेवण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन: एम.आय.डी.सी भोसरी, पिंपरी-चिंचवड, गुन्हा रजिस्टर नंबर व कलम: ३६७/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५(ए), १२५(बी), ३(५)), गुन्हा दाखल तारीख व वेळ: १३ जुलै २०२६, रात्री २२:४० वाजता, फिर्यादीचे नाव: सोहन मधुकर निकम (वय ५५, कार्यकारी अभियंता- पर्यावरण, पिंपरी-चिंचवड मनपा)
१. अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९): प्रकल्प प्रमुख (Project Head), अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. (सध्या राहणार: रिव्हर रेसिडेन्सी फेज-२, मोशी; मूळ गाव: गाझियाबाद, उत्तर प्रदेश)
२. विजय रामराव सपकाळ (वय ३८): सेफ्टी अधिकारी (Safety Officer). (सध्या राहणार: बिजलीनगर, चिंचवड; मूळ गाव: उमाळा, जि. बुलढाणा)
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातून संकलित केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे महत्त्वाचे कंत्राट ‘अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.’ या कंपनीला दिले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ‘एसएलएफ’ (कचऱ्याचा महाकाय ढिगारा) ला धोका पोहोचू नये, यासाठी त्याचे वारंवार तांत्रिक परीक्षण करणे आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची संपूर्ण जबाबदारी याच कंपनीची होती.
सुरक्षा उपाययोजना न केल्यास या ढिगाऱ्यामुळे मानवी जिविताची मोठी हानी होऊ शकते, याची पूर्ण पूर्वकल्पना प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांना होती. तरीही, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना जाणीवपूर्वक न केल्यामुळे ८ जुलै २०२६ रोजी दुपारी १:३० वाजता कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग शेजारील प्रशासकीय इमारतीवर व रस्त्यावर कोसळला. या हलगर्जीपणामुळे तिथे काम करणाऱ्या निष्पाप ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
९ मयत कामगार, १. भावेश मोहन वाणी (३३), २. अक्षय राजु सावंत (३२), ३. नागेश सर्जराव गायकवाड (२७), ४. सुनिल भारत कोरके (३६), ५. महेश सुरेश कुंभार (३२), ६. सनी अशोक माने (३६), ७. राहुल धोंडीबा गायकवाड (३७), ८. रणजीत जयवंत पाटील (२२), ९. वामन दगडु कसबे (५४)
१२ गंभीर व किरकोळ जखमी कामगार, अशोककुमार गुप्ता (आरोपी), मुनेंद्र सिंग, चंद्रशेखर सिंग, दादासाहेब आरडे, सोमनाथ शेळके, रणवीर सिंग, रामप्रताप चव्हाण, सचिन दबडगाव, सुजाता शिंदे, विजय सपकाळ (आरोपी), महेश राऊत आणि भुषण पाटील.
या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत पोलिसांत धाव घेतल्याने आता ‘अँटोनी लारा’ कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
