मातंग समाजाच्या ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये एल्गार! लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ अंमलबजावणीची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: मातंग समाजाच्या प्रदीर्घ प्रलंबित शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार आंदोलन छेडण्यात आले. लोकसेवक युवराज दाखले यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनादरम्यान मातंग समाजातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने नायब तहसीलदारांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निगडी येथील दिवंगत मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ असलेल्या राष्ट्रपेरणा महाराणा प्रताप आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी हिंदू मातंग एकता सेना आणि शिवशाही शासन पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
आंदोलकांचे नेतृत्व करताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले की, मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि उप-वर्गीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देखील महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उप-वर्गीकरणाची नितांत गरज असल्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे.
पंजाब आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये यापूर्वीच या उप-वर्गीकरणाची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ‘बिदर समितीचा‘ सकारात्मक अहवाल शासनाला सादर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणताही विलंब न करता या अहवालावर तातडीने स्वाक्षरी करून शासन आदेश काढावेत, अशी मागणी दाखले यांनी केली. तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारून मागण्या तात्काळ राज्य शासन व मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकसेवक युवराज दाखले यांनी आंदोलनादरम्यान प्रशासनासमोर इतर चार अत्यंत संवेदनशील मागण्या मांडल्या आणि त्यावर तात्काळ कारवाईचा आग्रह धरला. १. सोशल मीडियावर आराध्य दैवत व महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारी टीका-टिप्पणी करणाऱ्या समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत. २.सन २०१२ मध्ये महानगरपालिकेत ठराव पारित झाल्याप्रमाणे ‘हाप्किन महामंडळाची’ पाच एकर जागा ‘आर्टी’च्या मुख्य कार्यालयासाठी तात्काळ हस्तांतरित करण्यात यावी. ३. पिंपरी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. ४. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मारकासंदर्भात धमकी देणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
आंदोलनाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या ऐतिहासिक आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि मागण्यांचे समर्थन करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. शिवशाही शासन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, शिवशाही माथाडी कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, शिवशाही कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तथा आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वचे अध्यक्ष गणेश कलवले, शिवशाही महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा अर्चना शिंदे, सा लो डॉ. आण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वच्या माजी अध्यक्षा आशाताई शहाने, केशरताई लांडगे, वैशाली जाधव, सविता आव्हाड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, क्रांतिवीर विचार मंचाचे बाबु पाटोळे, शंकर भाऊ खवळे, मारूती सोनटक्के, शंकर भडकवाड, उत्तम सकटे, विजय देवरे, अर्जून दाखले, आकाश घोलप आणि मनोज गायकवाड आदी सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


