महाराष्ट्रातील तंत्रकुशल तरुणांना जागतिक व्यासपीठावर चमकण्याची सुवर्णसंधी! ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ साठी नोंदणी सुरू; जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, १३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज वृत्तसेवा:
अमरावती: महाराष्ट्रातील कुशल आणि तंत्रकुशल युवकांना आपल्या अंगभूत कौशल्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ (IndiaSkills Competition 2026-27) ची अधिकृत नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली असून, तंत्रकुशल उमेदवारांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा देशातील सर्वात मोठी व्यावसायिक कौशल्य स्पर्धा मानली जाते.
या स्पर्धेच्या माध्यमातून २३ वर्षांखालील तरुणांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून थेट ‘वर्ल्डस्किल्स’ (WorldSkills) सारख्या जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा पात्रता निकष ठेवण्यात आला आहे. वैयक्तिकरित्या ५६ विविध क्षेत्रांसह सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन या आधुनिक क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा. ऑटोनोमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन व लँडस्केप गार्डनिंग या क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील कौशल्य स्पर्धेत राज्यातील सर्व शासकीय व खाजगी आयटीआय (ITI), पॉलिटेक्निक (Polytechnic) आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस (Engineering Colleges), विविध विद्यापीठे (Universities), कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था राज्यातील संस्थांमधील सर्व पात्र विद्यार्थी सहभागी होऊ शकतात:
जिल्ह्यातील सर्व तंत्रकुशल उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कौशल्य सिद्ध करावीत आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
