news
Home पिंपरी चिंचवड हिंजवडी-तळवडे आयटी पार्क अन् औद्योगिक वसाहती मेट्रोने जोडणार; महापौर रवि लांडगे यांची आक्रमक भूमिका

हिंजवडी-तळवडे आयटी पार्क अन् औद्योगिक वसाहती मेट्रोने जोडणार; महापौर रवि लांडगे यांची आक्रमक भूमिका

लास्ट माईल कनेक्टिव्हिटीवर भर देत डीपीआरमध्ये सुधारणांचे निर्देश; शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या भवितव्याला गती देणार ‘व्हिजनरी’ नेतृत्व; महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकाराने मेट्रोच्या नव्या मार्गांचे भव्य नियोजन!

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी  लक्षण प्रधान दि. २७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील दळणवळणाच्या गरजा लक्षात घेऊन महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी ५० वर्षांचा दूरगामी विचार करून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या विशेष उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादरीकरण महापालिकेत पार पडले.

महापौर रवि लांडगे यांच्या संवेदनशील आणि भविष्यवेधी नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठीया, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे (PPT) प्रस्तावित मेट्रो विस्ताराच्या डीपीआरचे सादरीकरण केले. यामध्ये प्रस्तावित मार्ग, व्यवहार्यता, प्रवासी क्षमता आणि शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. “पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केवळ आजच्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. मेट्रोचे नियोजन हे पुढील अनेक दशकांचा विचार करून अत्यंत सर्वसमावेशक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असावे,” असे निर्देश त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. नव्याने विकसित होणारे निवासी भाग, औद्योगिक वसाहती, हिंजवडी-तळवडे आयटी पार्क, शैक्षणिक संकुले आणि व्यापारी केंद्रांना मेट्रो जाळ्याने जोडण्यासाठी डीपीआरमध्ये आवश्यक त्या सर्व सुधारणा तातडीने करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

नागरिकांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मेट्रो स्टेशनपासून कामाच्या ठिकाणी सहज पोहोचता यावे, यासाठी महापौर रवि लांडगे यांनी विशेष संकल्पना मांडली. मेट्रो स्थानकांवर बस सेवा, पार्किंग व्यवस्था, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’चा प्रभावी अंतर्भाव डीपीआरमध्ये असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कायमची फुटेल, प्रदूषणाला आळा बसेल आणि आयटी व औद्योगिक क्षेत्राच्या वाढीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

“पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आज आपण घेतलेले निर्णय शहराचे भविष्य घडवणार आहेत. त्यामुळे केवळ कागदावर योजना न आखता, प्रत्यक्ष अंमलबजावणीत नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. शहराच्या प्रत्येक घटकाला जोडणारा आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

रवि लांडगे, महापौर (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

महापौर रवि लांडगे यांच्या या पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली असून, नागरिकांमधून त्यांच्या या दूरदृष्टीचे आणि धडाडीच्या नेतृत्वाचे जोरदार स्वागत होत आहे.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!