पिंपरी-चिंचवडच्या महिला सक्षमीकरणाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘शून्य कचरा’ प्रकल्पातील अमूल्य योगदानाबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटाला ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार!
पिंपरी-चिंचवड,प्रतिनिधी आकाश कांबळे दि. २७ जुलै २०२६: मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या ‘शून्य कचरा (झिरो वेस्ट स्लम)’ प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर महापालिकेची मान उंचावली आहे. गवळीमाथा झोपडपट्टी परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाची अनोखी क्रांती घडवून आणणाऱ्या ‘श्रीकृष्ण महिला बचत गटास’ प्रतिष्ठित ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आसरा सोशल फाऊंडेशन (पुणे) आणि ओम पब्लिकेशन (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित ‘उत्कर्ष भारत सन्मान सोहळा – २०२६’ मध्ये हा सोहळा पार पडला. प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर आणि अश्विनी चौधरी यांनी हा मानाचा पुरस्कार, मानपत्र व सन्मानचिन्ह अत्यंत अभिमानाने स्वीकारले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १६ ऑगस्ट २०२२ रोजी गवळीमाथा येथून देशातील पहिल्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमात स्थानिक महिला बचत गटांना सहभागी करून घेत घराघरांत कचऱ्याचे वर्गीकरण, ओला व सुका कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली. श्रीकृष्ण महिला बचत गटाने अत्यंत जबाबदारीने, सातत्याने आणि समर्पित भावनेने काम करत संपूर्ण गवळीमाथा परिसर कचरामुक्त केला. त्यांच्या या यशस्वी मॉडेलमुळे इतर झोपडपट्टी परिसरांसाठीही एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
“स्वच्छ शहर आणि निरोगी पर्यावरणासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीकृष्ण महिला बचत गटाने केवळ कचरा व्यवस्थापनच केले नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेची सामाजिक चळवळ उभी केली. हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. महापालिकेच्या स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवडच्या स्वप्नाला अशा महिला शक्तीचे मोलाचे पाठबळ मिळत आहे.”
— रवि लांडगे, महापौर (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या ‘शून्य कचरा’ उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दाद अत्यंत अभिमानास्पद आहे. श्रीकृष्ण महिला बचत गटाचे मनःपूर्वक अभिनंदन! महिला बचत गटांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम किती प्रभावीपणे राबवता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्याचा भक्कम पाया आहे. कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण आणि योग्य व्यवस्थापनामुळे संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होते. गवळीमाथा परिसरात महिलांनी लोकसहभागातून निर्माण केलेला हा आदर्श संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त – आरोग्य विभाग (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“हा उपक्रम म्हणजे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा त्रिवेणी संगम आहे. श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. या राष्ट्रीय सन्मानामुळे शहरातील इतर बचत गटांनाही प्रेरणा मिळेल आणि अधिकाधिक परिसर शून्य कचऱ्याच्या दिशेने वाटचाल करतील.”
— अण्णा बोदडे, उप आयुक्त – झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
