पिंपरी-चिंचवडमध्ये ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’चा एल्गार; प्रथमच ‘साहित्यरत्न दौड’ आणि महापौर चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, दि. २८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखविणारे आहेत. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ यंदापासून सात दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी आणि परिसंवादांनी साजरे केले जाणार आहे. याअंतर्गत प्रथमच आयोजित करण्यात येणारी ‘साहित्यरत्न दौड’ आणि ‘१९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा’ या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,” असे आवाहन महापौर रवि लांडगे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अनिल घोलप, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मधुरा शिंदे, माजी नगरसदस्य मारूती भापकर, उपआयुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार, आरोग्याबाबत जनजागृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी या विशेष दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५ वाजता. , ३ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही दौड रंगणार आहे., सुमारे ४ हजारांहून अधिक युवक-युवती व नागरिक यात सहभागी होणार आहेत. सहभागींसाठी वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्स, सुरक्षा व्यवस्था पालिकेकडून उपलब्ध केली जाणार असून विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे दिली जातील.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसदस्य दिवंगत सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ ‘१९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
– २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीमध्ये, कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी, चिंचवड, याठिकाणी २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक गटांतील ४०० हून अधिक कॅरमपटू यात सहभागी होणार असून विजेत्यांना लाखांची रोख बक्षिसे व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत. या दोन्ही उपक्रमांमुळे शहरातील क्रीडा संस्कृतीला व सामाजिक एकतेला मोठी चालना मिळणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

