थेरगावात जुन्या वादातून तरुणावर पट्ट्याने अन् लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल!
थेरगाव/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
थेरगाव परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २० वर्षीय तरुणावर पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ही घटना २७ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अन्नपूर्णा खानावळ व स्नॅक्स सेंटरसमोर, कृष्णार्जुन मार्ग, पवारनगर, थेरगाव येथे घडली.
याबाबत फिर्यादी भीमाशंकर उर्फ नागेश महादेव जेवळे (वय २०) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चैतन्य कागे (वय १९), दर्शन सोमवंशी (वय २१) आणि ईरेश लोहार (वय २३) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, जुन्या वादाची कुसपत काढून आरोपी चैतन्य कागे याने पट्ट्याने फिर्यादी नागेश जेवळे यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. “जर या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार केली, तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी थेट जिवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून काळेवाडी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक फरार आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
