कामगार विभागाची सरळसेवा परीक्षा २९ आणि ३० जुलै रोजी; ८ जिल्ह्यांतील २२ केंद्रांवर होणार ऑनलाईन परीक्षा, उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील विविध रिक्त पदांसाठी आयोजित करण्यात आलेली सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ दिनांक २९ आणि ३० जुलै २०२६ रोजी पार पडत आहे. निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदांसाठी ही परीक्षा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता पूर्ण सतर्कता बाळगावी, असे आवाहन कामगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही ऑनलाईन परीक्षा राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ८ महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील २२ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) मार्फत नियोजन करण्यात आले आहे. संबंधित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून परीक्षा केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. “परीक्षेदरम्यान कोणीही व्यक्ती किंवा संस्था पास करून देण्याचे आमिष दाखवत असल्यास अथवा गैरमार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत असल्यास उमेदवारांनी अशा कोणत्याही अफवा किंवा आमिषांना अजिबात बळी पडू नये. असा कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास उमेदवारांनी तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
