सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणात महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त स्वतंत्र स्वच्छतागृहांचा समावेश करा; माजी नगरसेविका गिरीजादेवी कुदळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात ‘सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या धोरणामध्ये ३० लाख लोकसंख्येच्या शहरात महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित, स्वच्छ आणि अत्याधुनिक सुविधांयुक्त स्वच्छतागृहांचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी माजी नगरसेविका तथा शिक्षण मंडळाच्या माजी सभापती सौ. गिरीजादेवी प्रवीण कुदळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्थापन अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी हे धोरण आखल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे स्वागत केले. मात्र, शहरातील निम्म्या महिला लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत तुटपुंजी असून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
महिला लोकप्रतिनिधी या नात्याने गिरीजादेवी कुदळे यांनी प्रस्तावित धोरणात महिलांसाठी काहि सुविधांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. सर्व स्वच्छतागृहांच्या ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय असावी. स्वच्छतागृहात आरसा आणि हात धुण्यासाठी योग्य आणि स्वच्छ व्यवस्था असावी. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा दिव्यांची (लाइट्स) सोय आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना असाव्यात. नियमित देखभाल, स्वच्छता आणि तेथे महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती असावी. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या मातांसाठी स्वच्छतागृहात ‘बेबी चेंजिंग स्टेशन‘ची उभारणी केली जावी. महिलांच्या तातडीच्या गरजेसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्यात यावीत. वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर किंवा स्वतंत्र डिस्पोजल यंत्रणा कार्यान्वित करावी. महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व घटकांचा नव्याने तयार होणाऱ्या धोरणात समावेश करावा, अशी नम्र विनंती त्यांनी निवेदनाद्वारे महापालिका प्रशासनाला केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
