news
थ्रिल राईड्स, ३६०° डोम अन् एआर-व्हीआर झोन; निगडीचे ‘अप्पु घर’ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क बनणारगुरूंचा सन्मान अन् विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते विशेष सोहळाद्वेष अन् ध्रुवीकरणाऐवजी तरुण पिढीला हवाय रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि संविधानिक हक्क; प्रफुल्ल श्रीधर यांचे प्रतिपादनतृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरीत राज्यातील पहिले समुपदेशन केंद्र सज्ज; सावित्रीबाई फुले सभागृहात भव्य सोहळाउद्घाटनानंतर काही दिवसांतच उड्डाणपुलाची दुरवस्था; आमदार शंकर जगताप व भाजप प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप
Home अमरावती द्वेष अन् ध्रुवीकरणाऐवजी तरुण पिढीला हवाय रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि संविधानिक हक्क; प्रफुल्ल श्रीधर यांचे प्रतिपादन

द्वेष अन् ध्रुवीकरणाऐवजी तरुण पिढीला हवाय रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि संविधानिक हक्क; प्रफुल्ल श्रीधर यांचे प्रतिपादन

अंहिसक अन् शिस्तबद्ध संघर्षातून युवकांनी निर्माण केला नवा आदर्श; अंनिससह सामाजिक संघटनांचा पाठिंबा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

युवा आंदोलन : भगतसिंगांच्या स्वप्नातील भारताकडे वाटचाल

 

 

अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

देशाच्या इतिहासात काही आंदोलने केवळ एखाद्या तात्पुरत्या मागणीसाठी उभी राहत नाहीत; ती एका नव्या सामाजिक जाणीवेचा जन्म घडवतात. ती लोकशाहीला नवसंजीवनी देतात, सत्तेला उत्तरदायित्वाची जाणीव करून देतात आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाचा परिचय देशाला करून देतात. दिल्लीतील जंतर-मंतर येथे उभे राहिलेले युवक-विद्यार्थ्यांचे आंदोलन हे अशाच स्वरूपाचे एक ऐतिहासिक आंदोलन ठरले आहे. हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुरते मर्यादित नव्हते; ते संविधान, लोकशाही, सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी उभा राहिलेला बुलंद जनआवाज होता.

शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार, त्यांच्यावर झालेली दडपशाही आणि त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागविण्याचा प्रयत्न अत्यंत वेदनादायी होता. मात्र, या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही युवकांनी संयम, शिस्त आणि अहिंसेचा मार्ग सोडला नाही. संघर्षाला हिंसेची नव्हे, तर नैतिकतेची खरी ताकद असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.

 

या आंदोलनातील सर्वात मोठे यश म्हणजे भगतसिंगांच्या विचारांचा प्रत्यक्ष कृतीत झालेला पुनर्जन्म. भगतसिंग म्हणजे केवळ सशस्त्र क्रांतीचे प्रतीक नव्हे; ते विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता आणि शोषणमुक्त समाजाचे विचारवंत होते. त्यांनी युवकांना अंधश्रद्धा, अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले होते. जंतर-मंतरवरील युवकांनी घोषणांमधून, कृतीतून आणि शिस्तबद्ध संघर्षातून हाच विचार जिवंत केला.

या आंदोलनाने हे स्पष्ट केले की जात, धर्म, वर्ग, लिंग आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या भिंती मोडल्याशिवाय खरी लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. विविध भाषा, प्रदेश, धर्म आणि सामाजिक पार्श्वभूमीतील विद्यार्थी एका समान ध्येयासाठी एकत्र आले. महिलांचा सक्रिय आणि नेतृत्वकारी सहभाग हे या आंदोलनाचे सर्वात प्रेरणादायी वैशिष्ट्य ठरले. समता ही केवळ भाषणांमध्ये नव्हे, तर आंदोलनाच्या रचनेत आणि व्यवहारातही दिसून आली.

 

या आंदोलनाने सामूहिक नेतृत्वाचा नवा आदर्श देशासमोर ठेवला. व्यक्तिपूजेऐवजी विचारांना, संवादाला आणि लोकशाही प्रक्रियेला महत्त्व देण्यात आले. हजारो युवकांनी एकमेकांवर विश्वास ठेवत जबाबदाऱ्या वाटून घेतल्या; हीच संघटित लोकशक्तीची खरी ओळख आहे. तसेच पोस्टर, कविता, गीते, पथनाट्य, घोषवाक्ये आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून युवकांनी या आंदोलनाला देशव्यापी स्वरूप दिले. त्यांनी द्वेषाला प्रेमाने, अफवांना तथ्यांनी आणि हिंसेला विवेकाने उत्तर दिले. या संघर्षात डाव्या, प्रगतिशील, लोकशाहीवादी जनसंघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच अनेक सामाजिक संघटनांनी दिलेला पाठिंबा आंदोलनाला वैचारिक दिशा व नैतिक आधार देणारा ठरला.

 

या आंदोलनाने देशातील तरुणांच्या प्राधान्यक्रमांबाबत एक स्पष्ट संदेश दिला आहे. तरुणांना धार्मिक ध्रुवीकरण नको आहे, तर रोजगार हवा आहे. त्यांना द्वेषाचे राजकारण नको आहे, तर दर्जेदार शिक्षण आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था हवी आहे. त्यांना जातीच्या भिंती नको आहेत, तर समान संधी, सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्क हवे आहेत. हीच नव्या भारताची खरी दिशा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा मार्ग, महात्मा ज्योतिराव व सावित्रीबाई फुलेंचा शिक्षणातून मुक्तीचा विचार, राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्याय आणि भगतसिंगांचा वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा जिवंत आविष्कार या आंदोलनात दिसून आला.

आजची तरुण पिढी प्रश्न विचारते, संविधान वाचते, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारते आणि अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने संघर्ष करते. हा संघर्ष केवळ विद्यार्थ्यांचा नसून न्याय, समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांवर आधारित भारताच्या निर्मितीचा संघर्ष आहे. भगतसिंगांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारत घडविण्याची ताकद आजच्या युवकांमध्ये नक्कीच आहे.

— प्रफुल्ल मंदा श्रीधर

सामाजिक कार्यकर्ता

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!