उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या संवेदनशील पुढाकाराने पिंपरीत राज्यातील पहिल्या ‘तृतीयपंथीय समुपदेशन केंद्रा’चा दिमाखदार शुभारंभ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहराला सामाजिक समतेची नवी दिशा देत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे भव्य उद्घाटन उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या शुभहस्ते पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडले. उपमहापौर बाबर यांच्या अत्यंत संवेदनशील, सर्वसमावेशक आणि धोरणी नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवड शहराने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यासमोर सामाजिक क्रांतीचा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाचे नेटके आणि नेटके आयोजन ‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख व उपाध्यक्षा अर्चना मेंगडे यांनी केले होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी अत्यंत भावूक आणि प्रभावी विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. त्या म्हणाल्या,
“समाजाने तृतीयपंथीयांकडे दयेच्या किंवा सहानुभूतीच्या दृष्टीने न पाहता, समानतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला संविधानाने समान अधिकार दिले आहेत. तृतीयपंथीय असणे हा कोणताही शाप नसून तो निसर्गाचा सहज स्वीकार आहे. या बांधवांना केवळ मदतीचा हात न देता रोजगाराच्या व शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हे आपले कर्तव्य आहे. हे समुपदेशन केंद्र केवळ पिंपरी-चिंचवडसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल. महापालिकेच्या विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, महापालिका प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या या दूरदृष्टीपूर्ण व आदरयुक्त आवाहनाचे उपस्थित सर्वच घटकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
या ऐतिहासिक सोहळ्याला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सामाजिक समरसता गतिविधीचे विलास लांडगे, ॲड. मुकुंद यदमळ, हेमंतजी हरहरे, समाजविकास विभागाचे माजी अधिकारी सुहास बहादरपुरे तसेच तृतीयपंथीय समाजाच्या प्रतिनिधी डॉ. आम्रपाली मोहिते आणि शहरातील पहिल्या तृतीयपंथीय शिक्षिका किरण वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा उपक्रम देशासाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिक्षिका किरण वाघ यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत सर्व तृतीयपंथीयांना शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात तृतीयपंथीयांसाठी आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा मानस बोलून दाखवला. सुहास बहादरपुरे यांनी महापालिकेत तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून रोजगार देण्याच्या भावनिक प्रवासाला उजाळा दिला.
आयोजक आसिफ शेख व अर्चना मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नूतन केंद्राद्वारे, तृतीयपंथीयांना मानसिक व सामाजिक समुपदेशन पुरवणे, रोजगार व कौशल्य विकासाचे मोफत मार्गदर्शन, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाती व शासकीय योजना मिळवून देण्यासाठी मदत, केंद्र सरकारच्या SMILE योजना, गरिमा गृह योजना व ट्रान्सजेंडर कायद्याबाबत जनजागृती करणे.
या सोहळ्यास माधुरी वैरागे, उपेन्द्र धाकपाडे, अवनी, अक्षय, मनस्वी, संघप्पा यांच्यासह तृतीयपंथीय बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या पुढाकारामुळे वंचित घटकाला मिळालेल्या या सन्मानाचे शहरभरातून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


