पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील पुलावर एकाच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य; राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपळे निलख येथील रक्षक चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पसरले आहे. पुलाचे श्रेय लाटण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी घाईघाईत याचे उद्घाटन केले, असा थेट आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) अर्बन सेल शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या पुलावर उद्घाटनानंतर केवळ चार दिवसांतच गंभीर अपघात होण्यास सुरुवात झाली, त्यानंतर तेथे तातडीने उपाययोजना कराव्या लागल्या. आता पहिल्याच पावसात पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले असून, या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रदीप गायकवाड यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर कडक शब्दांत टीका केली आहे.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार आणि त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची भागीदारी, असेच समीकरण बनले आहे. कुत्र्यांची नसबंदी असो, सांगवी-बोपोडी येथील सरदार शितोळे सेतू असो, छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण असो की पाण्यातील कपात—प्रत्येक कामात खाऊगिरी आणि निकृष्ट काम हीच भाजपची ओळख झाली आहे. प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी आणि लूट महापालिका प्रशासनाने तात्काळ थांबवावी.”
— प्रदीप गायकवाड, शहराध्यक्ष (अर्बन सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट)
रक्षक चौकातील या उड्डाणपुलाची महापालिकेने आणि आमदारांनी त्वरित पाहणी करून तातडीने दुरुस्तीची कारवाई करावी, तसेच नागरिकांना व वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजास्तव या उड्डाणपुलावरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही प्रदीप गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

