8
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आरोग्य, स्वच्छता, पार्किंग आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांची माहिती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची अत्यंत महत्त्वाची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य सेवा, सार्वजनिक स्वच्छता, सर्वसमावेशक पार्किंग व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, क्रीडा सुविधा आणि प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणणाऱ्या अनेक धोरणात्मक विषयांना मंजुरी देण्यात आली.
वाढती वाहनसंख्या व वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी रस्त्यालगत व रस्त्याबाहेरच्या पार्किंगचे नियोजन, तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन, टेलिस्कोपिक शुल्क प्रणाली, दैनंदिन व मासिक पास तसेच निवासी पार्किंग परवान्यांची तरतूद असलेले पार्किंग धोरण लागू करण्यात आले.वाईसीएम (YCM) रुग्णालय व जिजामाता रुग्णालयातील एक्स-रे व डिजिटल रेडिओग्राफी उपकरणांची दुरुस्ती व खरेदी, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्राची देखभाल आणि ‘आयुष्मान भारत-PMJAY’ व ‘MJPJAY’ योजनेतील रुग्णांना औषधे व ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स उपलब्ध करून देण्यास मान्यता. सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची यांत्रिक स्वच्छता व देखभालीसाठी मुदतवाढ. निगडी परिसरातील शौचालयांची स्वच्छता महिला बचत गटांमार्फत चालवण्यास मंजुरी. ‘एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार जमा होणारा निधी भूसंपादन व वाटाघाटीसाठी वापरण्याकरिता नवीन लेखाशीर्ष तयार करण्यास मान्यता. २६ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी शहरातील स्पर्धा मार्ग, सायकल ट्रॅक, पदपथ आणि रस्ते आंतरराष्ट्रीय निकषांनुसार विकसित केले जाणार. बदली किंवा सेवानिवृत्तीनंतरही नागरिकांचा महापालिकेशी संपर्क तुटू नये, यासाठी अधिकाऱ्यांना व्यक्तीनिहाय क्रमांकाऐवजी पदानुसार कायमस्वरूपी मोबाईल सिम दिले जाणार. प्रभाग ११ मध्ये नवीन जलवाहिन्या, किवळेतील रस्ते सुधारणा, प्रभाग २५ मध्ये रस्ते प्रकाश व्यवस्था आणि पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याचे रुंदीकरण व केबल स्थलांतराची कामे मंजूर. विकास आराखड्यातील शैक्षणिक व इतर आरक्षित जागांसाठी विविध विभागांकडून NOC देण्याची प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी Standard Operating Procedure (SOP) लागू करणार.
“आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि पार्किंग या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याला महापालिकेचे प्राधान्य आहे. आजच्या सभेत शहराच्या दीर्घकालीन नियोजनासोबतच नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार सेवा मिळण्यावर भर देण्यात आला. क्रीडा क्षेत्राचा विकास, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पायाभूत सुविधा, प्रशासकीय सुसूत्रता आणि विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणत पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध आहे.”— अभिषेक बारणे, सभापती (स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
