16
सांगवी विकास मंचतर्फे संत नामदेव महाराज, संत सावता माळी आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना भावपूर्ण अभिवादन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: जुनी सांगवी येथील ‘सांगवी विकास मंच’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी श्रेष्ठ संत नामदेव महाराज, संत सावता माळी महाराज तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे व विशेष कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संत आणि महात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून यथोचित पूजा करण्यात आली.
या प्रसंगी विविध मान्यवरांनी संतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत गिरगुणे व दत्तात्रेय पवार सर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी व समाजोपयोगी कार्याचा परिचय करून दिला. ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी परिसराचे भूतपूर्व अध्यक्ष व माळी समाजाचे कार्यकर्ते अशोकराव भोसले यांनी संत सावता माळी यांच्या पांडुरंगाप्रती असलेल्या अलोट भक्तीचे व ईश्वर भक्तीच्या माहात्म्याचे भावस्पर्शी वर्णन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण भागवत यांनी संत नामदेव महाराजांचा जीवनप्रवास व त्यांच्या भक्तिप्रभावाचे विविध दाखले देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक कवीवर्य सुरेश कंक, प्रवचनकार ह.भ.प. बंडोपंत शेळके तसेच सांगवी येथील संत नामदेव महाराज मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ नेवासकर सर यांनीही या संतविभूतींच्या अलौकिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे आयोजक आणि सर्वांचे प्रेरणास्थान असलेले सांगवी विकास मंचचे विद्यमान अध्यक्ष महेशशेठ भागवत यांच्या सामाजिक कार्याचा प्रकर्षाने गौरव करत भरतशेठ कुंभार, नारायण भागवत, अण्णासाहेब कुंभार आणि मुरलीधरपंत दळवी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा सांगवी विकास मंचच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संतोष महामुनी, साहित्यिक कवीवर्य मुरलीधर दळवी, अहिल्याबाई होळकर समितीचे अध्यक्ष अभिमन्यू गाडेकर सर, कल्याण बोकडे, संदिपान सामसे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुनील कदम, लांडे साहेब, संत नामदेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अरुण खटावकर, लक्ष्मीकुमार माळवदे, नवीनचंद्र नाबरीया, अशोकराव भोसले, ओ.बी.सी. समाज नेते सुरेश गायकवाड, हरिश्चंद्र गायके, संपत भिटे, बंडोपंत शेळके, सुरेश लोखंडे, सुनील पोकरे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन नारायण भागवत यांनी केले, तर ज्येष्ठ उद्योजक भरतशेठ कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवीराज मुरलीधरपंत दळवी, अण्णासाहेब कुंभार, दिलीपकुमार फाकटकर, कृष्णकांत गिरगुणे, भरतशेठ कुंभार, सुनील पोकरे व दत्तात्रेय पवार यांनी परिश्रम घेतले. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
