44
तक्षशिला महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ‘ओरिएंटेशन कार्यक्रम’ उत्साहात संपन्न!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती संचलित तक्षशिला महाविद्यालय, ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विशेष ‘ओरिएंटेशन कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून शासकीय ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रितेश पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. कमलाकर पायस यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,
“विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तके, संदर्भग्रंथ, डिजिटल व ई-संसाधनांचा नियमित वापर करावा. डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला दिलेले योगदान आजही आपल्याला दिशा देणारे आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी वाचन आणि संशोधनवृत्ती वाढवून ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीत योगदान द्यावे.”
प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रंथालयाचा प्रभावी वापर, उपलब्ध ग्रंथसंपदा, ई-संसाधने, डिजिटल लायब्ररी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक माहिती मिळवण्याच्या आधुनिक पद्धतींची माहिती देऊन डॉ. रंगनाथन यांच्या मूलभूत योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे नेटके संचालन ग्रंथपाल डॉ. प्रणाली पेटे यांनी केले, तर आभार डॉ. प्रवीण वानखडे यांनी मानले. या प्रसंगी डॉ. अनिल भगत, डॉ. सनोबर कहेकशा, डॉ. संदीप हाडोळे, डॉ. रुपेश बेलसरे, डॉ. आनंद देशमुख, निरुपमा भोरे, मोनाली पाटील आणि सचिन कुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश अरगुलवार, अमोल तरोडकर आणि राजरतन सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
