25
१८ ऑगस्टला पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ट्रॅफिक अलर्ट’! मातंग समाजाच्या जनआक्रोश महामोर्चामुळे पिंपरी-निगडी मार्गावर वाहतूक बंद
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १८ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड जनसमुदाय जमण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक (चिंचवड स्टेशन) येथून सुरू होणारा हा मोर्चा निगडी येथील तहसीलदार कार्यालयावर धडकणार आहे.
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चिंचवड ते निगडी मार्गावर व जोडरस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून अपवाद ठेवण्यात आला आहे.
मोरवाडी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहतूक वाहतूक कार्यालयासमोरील ग्रेड सेपरेटरमार्गे वळवण्यात येईल. अग्रसेन भवनजवळील सर्व्हिस रोड बंद राहील, वाहनांना ग्रेड सेपरेटरमधून सरळ जावे लागेल. लोकमान्य हॉस्पिटल ब्रिजकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून अहिंसा चौक मार्गे जावे लागेल. दळवीनगर ब्रिजखालून मुंबईकडे जाणारी वाहने दळवीनगर ओव्हरब्रिजमार्गे वळवण्यात येतील. आकुर्डी गावठाणाकडून येणारी वाहने आंबेडकर चौक – म्हाळसाकांत चौक मार्गे जातील. दळवीनगर कडून येणारी वाहने गणेश व्हिजन-पिंपरी मार्गे, तर थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहने खडी मशीन वाय जंक्शन – परशुराम चौक मार्गे जातील. बजाज कंपनी गेटकडून अंडरपासमार्गे ब्रह्मा हॉटेलकडे जाण्यास बंदी राहील. प्रेस्टिज प्लाझासमोरील वाहनांना एसबीआय चौक किंवा भक्ती-शक्ती मार्गाने जावे लागेल. टिळक चौकाकडून भेळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी असून स्वानंद डेअरीकडून वाहतूक वळवली जाईल. भक्ती-शक्तीवरून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक बसवेश्वर पुतळा – अप्पुघर चौक – मुकाई चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
मोर्चाच्या कालावधीत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच अतिरिक्त वेळ राखून पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त व ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
