news
Home पिंपरी चिंचवड पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे विशेष व्याख्यानाचे आयोजन

पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे विशेष व्याख्यानाचे आयोजन

नारायण सुर्वे यांच्या साहित्याने कामगारांना लिहिते केले; कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे विशेष व्याख्यान | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नारायण सुर्वे यांनी श्रमाचे मोल अधोरेखित केले — पुरुषोत्तम सदाफुले

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: “नारायण सुर्वे यांच्या कविता केवळ शोषितांच्या जीवन-जाणिवेची, त्यांच्या श्रमनिष्ठेची आणि शोषणाच्या प्रक्रियेची चिकित्सा करणाऱ्या नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून, जगण्यातून आणि आत्मनिष्ठेतून प्रकट होणारा जिवंतपणा दाखवणाऱ्या आहेत. ‘ज्या कामगारांच्या हातावर घट्टे पडलेले आहेत, त्यांनी ते कागदावर लिहा’ असे सांगत सुर्वेंनी थेट कामगारांना लिहिते केले आणि समाजात श्रमाचे मोल खऱ्या अर्थाने अधोरेखित केले,” असे उद्गार नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे पुरुषोत्तम सदाफुले यांनी काढले.
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘कामगार आणि सुर्वे यांचे साहित्य’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम सदाफुले बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात सदाफुले पुढे म्हणाले की, नारायण सुर्वे यांनी केवळ लेखणीतूनच नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरून प्रत्यक्ष लढा दिला. १९९५ मध्ये परभणी येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी संमेलन अत्यंत यशस्वी केले. त्यांच्या या उत्तुंग साहित्यिक योगदानाबद्दल मध्य प्रदेश शासनाने त्यांना मानाच्या ‘संत कबीर पुरस्कारा’ने सन्मानित केले होते.
सध्या नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून वर्षभर विविध उपक्रम राबवले जात असून, त्या माध्यमातून सुर्वेंच्या विचारांचा आणि साहित्याचा जागर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कष्टकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिव तुषार घाटुळे, उपाध्यक्ष राजेश माने, निरंजन लोखंडे, लाला राठोड, इंदुबाई वाघचौरे, विद्या चव्हाण, रंजना गायकवाड, अनिता कोरे, विजया पाटील, सुनीता चव्हाण आदी मान्यवरांची व कामगारांची प्रमुख उपस्थिती होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!