42
महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम; कूलर, कुंड्या आणि पाण्याच्या टाक्यांची विशेष पाहणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष प्रतिबंधात्मक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुख्य इमारतीसह महापालिका आवारातील कूलर, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणांची सखोल पाहणी करण्यात आली.
सदर मोहीम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यापेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे वेळेत नष्ट करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह सर्व शासकीय व सार्वजनिक आस्थापनांच्या परिसरात डास उत्पन्न होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तपासणीदरम्यान कूलरमधील पाणी, कुंड्यांखालील ट्रे, पाण्याच्या टाक्या, वापरात नसलेली भांडी, कार्यालयीन परिसर व वाहनतळ या ठिकाणी साचलेले पाणी तत्काळ काढून टाकण्यात आले. भविष्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, महापालिकेकडून ही मोहीम सातत्याने राबवण्यात येणार आहे.
पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास डासांची पैदास वाढते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह कार्यालय आणि परिसराची नियमित पाहणी करून स्वच्छता राखावी. कूलर, कुंड्या व पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करून महापालिकेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या मोहिमेदरम्यान आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, वैद्यकीय अधिकारी (एनयूएचएम) डॉ. विजया आंबेडकर, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, प्रशासन अधिकारी संतोष कोराड, साथरोग अधिकारी डॉ. आनंदऋषी परिमल्ला, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, कांचनकुमार इंदलकर, स्नेहा चांदणे, राहुल जेटीथोर, सिटी प्रोग्राम मॅनेजर चैताली इंगळे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

