28
संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचेच: ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर; मराठवाडा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांचा गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / चिखली: “देशातील सद्यस्थिती पाहता राजकीय व्यवस्थेचे तरुणांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढती अनागोंदी, प्रवेश प्रक्रियेतील अडचणी आणि नीट (NEET) सारख्या परीक्षांमधील गोंधळ यातून तावूनसुलाखून निघाल्यानंतर तरुणांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहते. भ्रष्टाचाराच्या बोकाळलेल्या व्यवस्थेमुळे तरुण वर्ग नैराश्यात जाऊन व्यसनाधीनतेकडे आणि आत्महत्येकडे वळत आहे. या गंभीर परिस्थितीतून तरुण पिढीला बाहेर काढून योग्य दिशा दाखवण्यासाठी संस्कारांची अत्यंत गरज असून, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे हे पवित्र काम केवळ शिक्षकच करू शकतात,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी केले.
मराठवाडा प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या देवगिरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि मातोश्री प्राथमिक विद्यामंदिर (चिखली) येथील शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातुर्डेकर बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते दोन्ही शाळांमधील शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कुमार जाधव, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, लक्ष्मण लिंबापुरे, संचालिका स्मिता जाधव, प्रीती शिंदे, पूजा जाधव आणि प्राचार्या शहिदा सय्यद आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सातुर्डेकर म्हणाले की, आपल्या संस्कृतीत ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ असे मानले जाते. स्वामी विवेकानंदांच्या मते जीवनाची परिपक्वता म्हणजेच शिक्षण होय. ही परिपक्वता शिष्यामध्ये आणण्यासाठी जे अखंड परिश्रम घेतात, तेच खरे गुरू आहेत. आजच्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने पालकांना मुलांकडे पुरेसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे समाजाची पूर्ण आशा शिक्षकांवरच टिकून आहे. साक्षरता मोहीम, कुटुंब नियोजन असो किंवा मतदार याद्यांचे काम, सरकारला नेहमीच शिक्षकांची आठवण येते. मात्र, या शिक्षकेतर कामांच्या अतिरिक्त बोजामुळे शिक्षकांची मूळ कार्यक्षमता आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कुमार जाधव, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, संचालिका प्रीती शिंदे, प्राचार्या शहिदा सय्यद यांच्यासह कीर्ती दुरुगकर, मालन गाडीलकर, वर्षाली चेंगे, सबीना सय्यद आणि आरती खोडसुरे या शिक्षिकांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शितल तुपे व तेजना गिरमे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


