23
आगामी जनगणनेत अचूक व वैज्ञानिक जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन!
पुणे / मुंबई प्रतिनिधी आकाश कांबळे दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे / मुंबई: भारताच्या आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गाचा स्वतंत्र समावेश करून वैज्ञानिक व अचूक पद्धतीने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC) ओबीसी विभागाच्या वतीने भारताच्या मा. राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे निवेदन स्वीकारले.
सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणीसाठी आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीसाठी केवळ जात विचारणे पुरेसे नसून तिची अचूक, वैज्ञानिक आणि प्रमाणित नोंद होणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत या निवेदनातून व्यक्त करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशात एकाच जातीला प्रादेशिक नावे, उपनावे, पारंपरिक व्यावसायिक संबोधने किंवा शब्दलेखनातील फरकामुळे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जर कोणत्याही प्रमाणित वर्गीकरणाशिवाय जनगणनेत नोंदी घेतल्या गेल्या, तर एकाच समुदायाचे अनेक भागांत विभाजन होऊन चुकीची आकडेवारी समोर येण्याची भीती आहे. याचा थेट फटका OBC, अत्यंत मागासवर्गीय व कारागीर समाजाला बसू शकतो.
जनगणनेच्या प्रश्नावलीत OBC प्रवर्गासाठी स्वतंत्र व स्पष्ट स्तंभ उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक मान्यताप्राप्त जातीसाठी विशिष्ट कोड निश्चित करून त्याअंतर्गत समानार्थी व प्रादेशिक नावांचे एकत्रीकरण करावे. अधिकृत नोंदी व मानवंशशास्त्रज्ञांच्या पुराव्या आधारे प्रत्येक राज्याची जात-मास्टर यादी तयार करावी. डिजिटल जनगणनेसाठी गणकांना शोधक्षम (Searchable) ड्रॉप-डाउन मेनू द्यावा, ज्याद्वारे अचूक जात-कोड जोडणे सुलभ होईल. समाजशास्त्रज्ञ, सांख्यिकी तज्ज्ञ आणि घटनातज्ज्ञांचा समावेश असलेली बहुविषयक राष्ट्रीय समिती स्थापन करावी. जात व सामाजिक संघटनांशी चर्चा करून प्रादेशिक नावे व उपनावांची अचूक पडताळणी करावी. तेलंगणातील सामाजिक-आर्थिक व जात सर्वेक्षणाच्या (SEEEP) कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून देशासाठी मजबूत प्रणाली विकसित करावी. या काँग्रेसच्या प्रमुख ७ मागण्या आहेत.
हे निवेदन सादर करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सचिव संजय रायकर, समन्वयक विशाल पवार, सरचिटणीस किशोर कळसकर, राजीव गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश नवले, भाई विशाल जाधव, राज्य समन्वयक अनिकेत गावडे तसेच पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी सागर राऊत, महेश वाळुंज आणि अभिषेक शेळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन Daily News. सर्व हक्क राखीव.
