news
Home अमरावती ‘अंधश्रद्धा व व्यसनाधीनता मुक्त समाजासाठी एकत्र या’; अमरावतीच्या भातकुली तालुक्यात जनजागरण कार्यक्रम!

‘अंधश्रद्धा व व्यसनाधीनता मुक्त समाजासाठी एकत्र या’; अमरावतीच्या भातकुली तालुक्यात जनजागरण कार्यक्रम!

गणेशोत्सवाला मिळाले सामाजिक प्रबोधनाचे स्वरूप; 'नशाबंदी प्रदर्शन' व संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर वक्त्यांचे प्रबोधन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अंधश्रद्धा निर्मूलन, संविधान जागर व व्यसनमुक्तीचा गोपगव्हाण येथे प्रबोधन कार्यक्रम!

अमरावती/गोपगव्हाण (भातकुली) प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

गोपगव्हाण (ता. भातकुली, जि. अमरावती):  येथील बाल गणेश मंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अमरावती), संविधान जागर (अमरावती) आणि महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ (अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन, संविधान जागर व व्यसनमुक्ती जनजागरणाचा विशेष प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. रविवारी (दि. २० सप्टेंबर) सायंकाळी ७ ते ९:३० या वेळेत रंगलेल्या या कार्यक्रमाद्वारे गणेशोत्सवाच्या मंचावरून वैचारिक व सामाजिक क्रांतीचा संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिकेत कराळे होते. या वेळी मुख्य वक्ते म्हणून निखिल राजणकर (संविधान जागर), दिगंबर मेश्राम, प्रफुल्ल मंदा श्रीधर आणि मयूर विघे (महा. अंनिस अमरावती) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उपस्थितांशी संवाद साधताना वक्त्यांनी सांगितले की, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि चमत्कारांच्या भूलथापांना बळी न पडता समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि सत्य शोधण्यासाठी प्रश्न विचारण्याची सवय अंगीकारली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने कोणत्याही दाव्याची चिकित्सा करूनच त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

संविधान जागराच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. ही मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन आयुष्यात उतरवण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली. तसेच व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज कसा उद्ध्वस्त होतो, हे सांगत व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या अंतर्गत बाल गणेश मंडळाच्या वतीने गोपगव्हाण येथे दररोज नशाबंदी जनजागरण व प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनासोबतच अंनिस आणि संविधान जागराचे उपक्रम राबवून उत्सवाला सामाजिक प्रबोधनाचे स्वरूप देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रफुल्ल मंदा श्रीधर (जिल्हा कार्याध्यक्ष – महा. अंनिस अमरावती तथा जिल्हा संघटक – महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ) यांचा मोलाचा पुढाकार लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर विघे यांनी केले, तर सौरभ गिरणारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल गणेश मंडळाचे सतीश पेढेकर, नामदेव मोवाड, अंकुश लोखंडे, प्रज्वल वानखडे, गिरीश मोवाड यांच्यासह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बाल गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गोपगव्हाण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!