24
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’च्या हास्यविनोदासह ‘भूमिका’ने गाजविला अभिजात मराठीचा रंगमंच!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: अभिजात मराठी भाषेची समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा नागरिकांसमोर आणण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी दुपारच्या सत्रात संतोष पवार लिखित व दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि सायंकाळच्या सत्रात क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या दोन वैविध्यपूर्ण नाटकांचे सादरीकरण झाले. हास्यविनोदापासून ते सामाजिक आणि वैचारिक आशयापर्यंत मराठी रंगभूमीचे विविध पैलू या दोन्ही नाटकांतून रसिकांना अनुभवता आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
दुपारच्या सत्रात सादर झालेल्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाने दोन कुटुंबांमधील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नाच्या गडबडीतून निर्माण होणाऱ्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. पात्रांच्या शारीरिक अडचणी आणि वैशिष्ट्यांमधून निर्माण होणारे गैरसमज व चटपटीत संवादांतून कुटुंबातील उणिवा स्वीकारत प्रेम जपण्याचा सुंदर संदेश नाटकाने दिला.
तर सायंकाळच्या सत्रातील ‘भूमिका’ या गाजलेल्या नाटकाने रंगमंचाला गंभीर आणि वैचारिक वळण दिले. ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनयाने रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. केवळ रंगमंचावरील व्यक्तिरेखा साकारण्यापुरते मर्यादित न राहता, समाजाप्रती आणि मूल्यांप्रती स्वतःची ‘भूमिका’ काय असावी, याचा विचार करायला लावणाऱ्या या नाटकातील सामाजिक समता, अस्मिता व संविधानिक मूल्यांच्या मांडणीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
लोकजागर ऍक्टिव्हिटीजच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘सणयात्रा’ या कार्यक्रमातून मराठी पंचांगानुसार येणाऱ्या विविध सणांची वैशिष्ट्ये, त्यामागील परंपरा आणि कथा नृत्य व संगीताच्या सुरेल साथीने उलगडण्यात आल्या.
बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारे विविध कार्यक्रम-
१) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड- दुपारी १२:३० वाजता ‘फोक लावणी’ (प्रवेश केवळ महिलांसाठी), सायंकाळी ५:३० वाजता भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ (विनोदी नाटक), रात्री ९:३० वाजता ‘स्वर मराठी मनाचा’ (स्वरमयी प्रवास),
२) नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी –दुपारी १२:३० वाजता ‘लावण्यरंग’ हा ठसकेबाज लावणी कार्यक्रम (प्रवेश केवळ महिलांसाठी), सायंकाळी ५:०० वाजता ‘गझलभाव’ (मराठी गझल व भावगीते), रात्री ८:०० वाजता स्वप्नील जोशी आणि विदुला चौगुले अभिनीत ‘लग्नपंचमी’ (नाटक)
३) आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी- सकाळी १०:०० वाजता स्थानिक कवींचे कवी संमेलन, दुपारी १२:३० वाजता ‘गंध मराठी कलेचा’ (स्थानिक कलाकारांचा सहभाग), दुपारी ३:०० वाजता ‘मराठी साहित्याचे विश्व’ (चर्चासत्र), सायंकाळी ५:३० वाजता शाहिर प्रकाश ढवळे व सहकाऱ्यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम
४) ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी- सकाळी ९:०० वाजता (छोटे सभागृह) महापालिका शाळांअंतर्गत समूह नृत्य स्पर्धा, सायंकाळी ७:०० वाजता (मोठे सभागृह) लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा भव्य लोककला सोहळा – ‘मी मराठी’ .
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

