62
पुणे मनपा व आनंदवन फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० वृक्षांचे पुनर्रोपण!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: कोथरूडमधील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘ग. अ. कुलकर्णी पथ ते कर्वे पुतळा’ डीपी रोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वाकांक्षी हरित उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येवलेवाडी येथील सर्व्हे क्रमांक १८ मधील तब्बल सात हेक्टर जागेवर ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि बाधित होणाऱ्या ५०० विद्यमान वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण (Transplantation) करण्याच्या या उपक्रमाचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेचे पुरुषोत्तम भूतडा आणि आनंदवन फाउंडेशनचे संस्थापक सचिव भूपेश शर्मा यांच्या हस्ते रोपण करून या हरित मोहिमेचा प्रारंभ झाला.
प्रकल्पाची गरज आणि पर्यावरणाचा समतोल याविषयी बोलताना पुरुषोत्तम भूतडा म्हणाले, “कोथरूड परिसरातील वाढता पुनर्विकास, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता अंतर्गत दळणवळण सुधारण्यासाठी कर्वे पुतळा रस्ता जोडणी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रमुख रस्त्यांवरील आणि चौकांमधील वाहतुकीचे विभाजन होईल. मात्र, पायाभूत सुविधांचा विकास करतानाच पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आनंदवन फाउंडेशनने या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. लागवड आणि पुनर्रोपण केलेल्या सर्व वृक्षांच्या दीर्घकालीन देखभालीची व संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिका पार पाडेल.”
आनंदवन फाउंडेशनचे संस्थापक सचिव भूपेश शर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “आमच्या देखरेखीखालील सात हेक्टर जागा पुणे मनपाला उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होत आहे. वृक्षांची योग्य देखभाल झाल्यास पुण्याच्या हरित क्षेत्रात (Green Cover) मोलाची भर पडेल आणि हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत ठरेल.”
कोथरूड परिसरात गेल्या काही वर्षांत झालेल्या पुनर्विकासामुळे जुने अंतर्गत रस्ते वाढत्या वाहतुकीसाठी अपुरे पडत होते. हा नवीन डीपी रोड सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूरक ठरणार आहे. नळ स्टॉप ते वारजे आणि माणिकबाग दरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘पुणे मेट्रोच्या ४अ’ विस्तारामुळे भविष्यात या भागातील वाहतूक अधिक गतिमान आणि सुलभ होण्यास मदत होईल.
सदर उपक्रमाच्या संमतीपत्राची प्रत उपवनसंरक्षक (पुणे) यांच्याकडेही सुपूर्द करण्यात आली असून, विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधणारा हा उपक्रम पुण्याच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

