169
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनस, ग्रॅज्युटी, विमा आणि ‘समान काम समान वेतना’साठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे तीव्र पाठपुरावा केला जाणार आहे, अशी ग्वाही कामगार नेते तथा संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.
संत तुकाराम नगर (पिंपरी) येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभा मंडपात राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आयोजित भव्य कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना यशवंतभाऊ भोसले यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर भाष्य करत शासनाकडे प्रमुख मागण्या मांडल्या. सन २०२५-२६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी देण्यात यावा तसेच सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व बोनसचा लाभ त्वरित मिळावा. सफाई कर्मचारी आणि परिचारिकांना (नर्सेस) कुटुंबासह ५ लाख रुपयांपर्यंतची विमा पॉलिसी लागू करावी. राज्यातील सर्व महापालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी (परमनंट) कर्मचाऱ्यांप्रमाणेच कायद्यानुसार ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे. किमान वेतन दराप्रमाणे वेतन न देणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. ‘पंतप्रधान आवास योजने‘अंतर्गत कर्मचाऱ्यांना ४५० चौरस फुटांचे घर मिळावे. तसेच औद्योगिक आरोग्य-सुरक्षा (NGT) नियमांनुसार कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने आणि वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी व उपचार पुरवले जावेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासनाला लेखी निवेदन दिले जाणार आहे.
दरम्यान, या सर्व मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त श्री. अभय गीते यांच्यासोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले. या मेळाव्यास कंत्राटी व कायमस्वरूपी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
