35
एआय मुळे विश्वाच्या मूलभूत नियमांचा शोध नव्याने घेतला जाईल – डॉ. आशुतोष कोतवाल
पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: वैज्ञानिक संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मानवी बुद्धिमत्ता यांची पूरक भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. उच्च ऊर्जा कण प्रयोगांमध्ये (High Energy Particle Physics) कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. एआय मुळे विश्वाच्या मूलभूत नियमांचा शोध नव्याने घेतला जाईल, असा विश्वास अमेरिका येथील ड्युक विद्यापीठाचे प्रा. डॉ. आशुतोष कोतवाल यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCoE) मधील संगणक अभियांत्रिकी विभाग आणि संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिग्ज बोसॉनच्या पलीकडे – डार्क मॅटर आणि चिपवरील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. कोतवाल मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. आशुतोष कोतवाल म्हणाले की, डार्क मॅटर आणि त्याचे स्वरूप तसेच उत्पत्ती समजून घेण्यासाठी सध्या सुरू असलेले वैज्ञानिक प्रकल्प एआयमुळे अधिक क्रियाशील आणि कार्यक्षम होतील. जलद व तत्काळ माहिती (Real-time data) शोधण्यासाठी सिलिकॉन चिपवर थेट एआयचा अल्गोरिदम कार्यान्वित करता येणे शक्य आहे. यासाठी एआयची प्रणाली अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह, समजण्यास सुलभ आणि स्पष्टीकरण करता येईल अशी असणे गरजेचे आहे.
या व्याख्यानाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता, कण भौतिकशास्त्र आणि विश्वातील गूढ घटक यांच्यातील परस्परसंबंधांवर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या आयोजनात ‘विज्ञान भारती’, ‘जीआरएसएस’ आणि ‘जीआयएसटी’ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास जीआयएसटीचे समन्वयक नंदकुमार पळकर, पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे सचिव डॉ. कौस्तुभ साखरे, कौन्सिल सदस्य अमोल देशपांडे, मानसी जोशी आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
