25
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास व अण्णा भाऊ साठे साहित्यावरील पाच ग्रंथांचे प्रकाशन!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: “लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी माध्यम असून महान व्यक्तींचे विचार, मूल्ये आणि सामाजिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात साहित्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काळाच्या ओघात घटना आणि व्यक्ती विस्मृतीत जातात; परंतु लेखकाने शब्दबद्ध केलेले साहित्य चिरंतन स्मरणात राहते. भारतातील संत परंपरा ही केवळ अध्यात्माची परंपरा नसून ती समानतेची आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. जिष्णु देव वर्मा यांनी केले.
संत रविदास महाराज आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा व्यापक पट उलगडणाऱ्या पाच महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते राजभवन, मुंबई येथे निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
१. ‘संत रविदास म्हणे!’ – लेखिका: तहसीलदार स्नेहलता स्वामी (बिंदू)
२. ‘अण्णा भाऊ साठे : साहित्यविचार, संशोधन आणि चिंतन’ – संपादक: डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे (संस्थापक-अध्यक्ष, मातंग साहित्य परिषद)
३. ‘अण्णा भाऊ साठे : आकलन आणि आस्वाद’ – संपादक: डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे
४. ‘अण्णा भाऊ साठे : अवधारणा और जागरण’ (हिंदी) – संपादक: डॉ. धनंजय भिसे व डॉ. संतोष रोडे
५. ‘अण्णा भाऊ साठे : अ ट्रान्सनॅशनल लिटररी लेगसी’ (इंग्रजी) – संपादक: डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. माणिक सोनावणे व डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे
प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना राज्यपाल पुढे म्हणाले की, “साहित्य हे विविध भाषा, प्रदेश आणि पिढ्यांना जोडणारा सेतू आहे. संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. समाजात फुलांऐवजी पुस्तके भेट देण्याची संस्कृती रुजायला हवी, कारण फुले कोमेजतात; मात्र पुस्तकांतील विचार दीर्घकाळ जिवंत राहतात आणि समाजावर प्रभाव निर्माण करतात.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बळीराम गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित चारही ग्रंथांची सविस्तर ओळख करून देत, अण्णा भाऊ साठे हे वंचित आणि श्रमिकांच्या जीवनाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणारे व्यापक मानवतावादी साहित्यिक असल्याचे अधोरेखित केले. तर श्रीमती स्नेहलता स्वामी यांनी ‘संत रविदास म्हणे!’ या ग्रंथामागील लेखकीय भूमिका मांडली.
या प्रसंगी पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, विष्णू वझे, कैलास सोनटक्के, हेमंत हरहरे, निलेश गद्रे, रवींद्र गोळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (आर्टी) व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार, नागेश धोंडगे, विलास लांडगे, नागेश पाटील, सागर शिंदे, सचिन राऊत, अनिल सौंदाडे, समीर पाचारणे, राहुल कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राज्यपाल कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. प्रशांत नारनवरे (IAS) यांनी केले, तर उपस्थितांचे आभार निलेश गद्रे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

