60
गोष्ट सांगण्याच्या परंपरेला ‘कथाकथना’तून मिळाला पुनरुज्जीवनाचा स्पर्श!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या तिसऱ्या दिवशी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कथाकथनाचा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. रजनी शेठ, ज्योती पुजारी, डॉ. दिलीप गरुड आणि डेगवेकर यांनी विविध कथा व अनुभव आपल्या प्रभावी शैलीत सादर करत रसिकांना समृद्ध कथाविश्वाची सफर घडवली. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कथाकथन ही केवळ गोष्ट सांगण्याची कला नसून त्यातून अनुभव, विचार आणि जीवनमूल्ये प्रभावीपणे मांडली जातात. पूर्वी आजी-आजोबा आणि आई-वडिलांकडून ऐकल्या जाणाऱ्या गोष्टींमधून मनोरंजनासोबतच संस्कार पोहोचत असत. बदलत्या काळात कमी होत चाललेल्या या गोष्ट सांगण्याच्या समृद्ध परंपरेला पुन्हा उजाळा देण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांनी ‘झेल्या’ ही कथा अत्यंत मिश्कील आणि प्रभावी शैलीत सादर केली. आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि प्रसंगानुरूप अभिनयाच्या जोरावर त्यांनी कथेतील व्यक्तिरेखा रसिकांसमोर हुबेहूब जिवंत केल्या. – डॉ. दिलीप गरुड
त्यांनी अनुभवाधारित कथा सादर करत कथानकातील भावभावना व व्यक्तिरेखांचे विविध पैलू सहजतेने उलगडले. त्यांच्या निवेदनातील सहजतेमुळे रसिक कथेमध्ये तल्लीन झाले. यावेळी त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. – डॉ. रजनी शेठ
त्यांनी ‘नागपुरीने केला पुणेरी भतार’ ही कथा विनोदी व खुसखुशीत शैलीत सादर करत प्रेक्षकांना हस Sti हसवून लोटपोट केले. – ज्योती पुजारी
त्यांनी विविध अनुभव आणि प्रसंगांचे कथनातून सादरीकरण करत कार्यक्रमात वैविध्य आणले. – डेगवेकर
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बी. र. माडगूळकर यांनी केले. अभिजात मराठी भाषेतील सहजता, गोडवा आणि वैविध्य या कथाकथनाच्या माध्यमातून रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता आले.
या प्रसंगी महापालिकेचे प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, ग्रंथालय समन्वयक प्रवीण चाबुकस्वार, संगीत शिक्षक संतोष साळवे, आचार्य अत्रे रंगमंदिर व्यवस्थापक प्रशांत यादव यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव, राजेंद्र घावटे, सुहास पोकळे, आसाराम कसबे, पौर्णिमा कोल्हे, किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
