30
शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा; शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार! – बाळासाहेब गोतारणे
पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव असलेला शिक्षकच शिक्षकांच्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या गरजा अधिक संवेदनशीलतेने समजू शकतो. त्यामुळे “शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा” ही माझी ठाम भूमिका असून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठवणार, असा ठाम निर्धार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार श्री. बाळासाहेब गोतारणे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “माझी उमेदवारी केवळ आमदार होण्यासाठी नाही, तर ग्रामीण व मराठी माध्यमाच्या शाळांना बळकटी मिळावी आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी आवाज निर्माण व्हावा, या व्यापक उद्देशाने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे,” असे गोतारणे यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रमुख समस्यांवर भाष्य करताना गोतारणे यांनी मुद्द्यांवर ठोस पाठपुरावा करण्याचा मानस व्यक्त केला. जुनी पेन्शन योजना, शाळांचे प्रलंबित अनुदान, वेतन व सेवा-सवलती, वरिष्ठता व पदोन्नती, तसेच निवृत्तीनंतरच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न मार्गी लावणे. संचमान्यता, रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि शिक्षकांवरील गैरशैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करणे. गावांतील शाळा ही विकासाची केंद्र आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाली तरी शाळांचे महत्त्व कमी होत नाही. ग्रामीण व मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी विशेष निधी व सुविधा मिळवून देणे.
शिक्षण केवळ परीक्षा आणि गुणांपुरते मर्यादित न राहता कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मूल्यांवर आधारित असावे, असे मत त्यांनी मांडले. ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालये आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा करताना त्यांना आवश्यक साधने व विश्वासाचे वातावरण दिले पाहिजे. धोरणात्मक निर्णय घेताना प्रत्यक्ष वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांचे मत शासनाने गांभीर्याने विचारात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी सतत संवादात राहून केवळ सभागृहात प्रश्न मांडणेच नव्हे, तर ते सुटेपर्यंत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
“शिक्षकांनी मला विधान परिषदेत पाठवले, तर तो माझा वैयक्तिक विजय नसून शिक्षकांच्या हक्कांचा आणि शिक्षणव्यवस्थेतील बदलांचा विजय असेल,” असे सांगत बाळासाहेब गोतारणे यांनी सर्व शिक्षक मतदारांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
