22
ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक परंपरा आणि वास्तुकला यांतील संबंध समजून घेणे गरजेचे – डॉ. स्मिता सूर्यवंशी
आकुर्डी, पुणे प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
आकुर्डी: “वास्तुविशारद (आर्किटेक्चर) शाखेतील विद्यार्थ्यांना देहू व आळंदी येथील ऐतिहासिक वास्तू या स्थानिक सांस्कृतिक परंपरा, परिसराचा संदर्भ आणि वास्तुकला यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहेत. वास्तू ही केवळ एक भौतिक रचना नसून तिच्यामागे इतिहास, संस्कृती, परंपरा, स्थानिक जीवनशैली आणि परिसराशी असलेले नाते दडलेले असते. वास्तुकला ही समाज, संस्कृती, पर्यावरण आणि मानवी जीवनाशी जोडलेली एक सर्जनशील प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी हे बारकावे समजून घेऊन या क्षेत्रात आपले यशस्वी करिअर घडवावे,” असे प्रतिपादन एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये प्रथम वर्ष बी.आर्क.च्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ २०२६’ हा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना आर्किटेक्ट प्रज्ञा आवटे यांनी सांगितले की, “वास्तुकलेचा अभ्यास हा केवळ वर्गातील सैद्धांतिक ज्ञानापुरता मर्यादित नाही. तो प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभव, प्रयोग, सर्जनशील विचार आणि समूहकार्याच्या (Team Work) माध्यमातून अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येतो.” या वेळी त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून मॉडेल मेकिंग करणे आणि वास्तुकलेच्या अभ्यासात फोटोग्राफीचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत पीसीईटीचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
