25
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून उलगडला मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांसह नागरिकांपर्यंत पोहोचावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत बालकलाकारांनी विविध नृत्याविष्कारांतून महाराष्ट्राची संस्कृती, लोककला आणि लोकपरंपरांचे सुंदर दर्शन घडविले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातून कलाप्रकारांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.

आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या छोट्या सभागृहात पार पडलेल्या या समूह नृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी— ‘गोंधळ-कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ , ‘आले मराठे’ , ‘आई गं तुझ्या चरणी’ , ‘जिजाऊंच्या लेकी’ , ‘शाळा मराठी’ , ‘गौरव शब्दकलेचा, गौरव लोककलेचा’ अशा विविध आणि सामाजिक-सांस्कृतिक विषयांवर आधारित समूह नृत्ये सादर केली. पारंपरिक वेशभूषा, लयबद्ध संगीत, नृत्य आणि लोककलेचा सुरेख मेळ साधत बालकलाकारांनी मराठी संस्कृतीचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे व्यासपीठावर मांडले.

बालकलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह उत्साहाने भारून गेले होते. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतील लोकपरंपरा, कला आणि सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
या स्पर्धेत महापालिकेच्या पुढील प्रमुख शाळांनी उत्साहाने सहभाग घेतला. महापालिका शाळा क्रमांक ९०३, पुनावळे , इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, भोसरी , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर , महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, भोसरी , यशवंतराव चव्हाण कन्या प्राथमिक शाळा, थेरगाव , यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव , पुनावळे प्राथमिक शाळा, मोरवाडी
मराठी भाषेचा केवळ पुस्तकी अभ्यास न करता तिच्याशी जोडलेले साहित्य, कला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा अशा उपक्रमांमागील मुख्य हेतू आहे. या समूह नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासोबतच व्यासपीठावर आत्मविश्वासाने सादरीकरण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. कार्यक्रमाचे नेटके प्रास्ताविक जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
