पिंपरी, दि. २ मे २०२५: पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे! पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (C-DAC), पुणे यांनी एकत्रितपणे एक प्रगत “पर्जन्यमान व पूर अंदाज – पूर्वसूचना प्रणाली (अर्ली डिटेक्शन सिस्टीम)” सुरू केली आहे. या प्रणालीमुळे आता हवामान, हवेची गुणवत्ता आणि पुराचा अचूक अंदाज लावणे शक्य होणार असून, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी होणार आहे.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन (NSM) अंतर्गत ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. C-DAC पुणे येथील उच्च कार्यक्षमता संगणन (HPC) गटाने भारतीय शहरांमधील विविध पर्यावरणीय समस्यांचा (पाऊस, पूर, वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा) सखोल अभ्यास करून त्यांचे संगणकीय मॉडेल तयार केले आहेत. यासाठी एक खास मल्टि-सेक्टोरियल सिम्युलेशन लॅबची स्थापना करण्यात आली आहे, ज्यात हवामान, जलव्यवस्थापन, आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या अनेक क्षेत्रांतील घटकांचा समावेश आहे. या प्रयोगशाळेत आभासी प्रयोगांच्या माध्यमातून या घटकांच्या परिणामांचा अभ्यास केला जात आहे.

या प्रयोगशाळेच्या मदतीने एक विज्ञान आधारित निर्णय सहाय्यक आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे शहर प्रशासनाला योग्य धोरणे ठरवण्यासाठी मदत मिळणार आहे. या प्रणालीमुळे पाऊस, पूर आणि वायू प्रदूषणासारख्या शहरी समस्यांची वेळेत ओळख पटवून त्यावर त्वरित उपाययोजना करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे हाताळता येईल.
प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये:
- उच्च कार्यक्षम संगणनावर आधारित एकात्मिक प्रणाली: शहर, वॉर्ड, गाव आणि तहसील स्तरावर हवामान, जलविज्ञान आणि वायू गुणवत्तेचे उच्च रिझोल्यूशन मॉडेलिंग. ७२ तासांपर्यंत पाऊस, उष्णतेची/थंडीची लाट, पूर, जलाशय व्यवस्थापन आणि वायू प्रदूषणाचे अचूक भाकीत.
- स्वयंचलित पडताळणी व मूल्यांकन प्रणाली: हवामान आणि पूर अंदाजांच्या अचूकतेसाठी प्रत्यक्ष आकडेवारीशी तुलना करण्याची स्वयंचलित प्रणाली.
- एंड टू एंड वेब GIS आधारित निर्णय सहाय्यक प्रणाली (DSS): विविध क्षेत्रांसाठी अलर्ट्स, डेटा विश्लेषण, GIS आधारित दृश्यांकन आणि परस्परसंवादी माहितीचे सुलभ माध्यम. धोरणकर्ते आणि नागरिकांना हवामान व पूर माहिती सहज उपलब्ध.
- स्थानिक पातळीवर त्वरित निर्णयासाठी मदत: शहर आणि गाव स्तरावरील निरीक्षणांच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी प्रशासनाला योग्य वेळी निर्णय घेण्यास मदत.
या प्रणालीमुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना हवामानातील आपत्कालीन स्थितीची माहिती वेळेत मिळणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे.
“आपत्तीपूर्व तयारी ही सुरक्षित शहराच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. C-DAC च्या सहकार्याने विकसित केलेली ही प्रगत हवामान व पूर पूर्वसूचना प्रणाली पिंपरी चिंचवड शहराला अधिक सक्षम, जागरूक आणि आपत्ती निवारणासाठी सज्ज बनवेल. या प्रणालीच्या मदतीने धोरण निर्मितीपासून नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणामकारक निर्णय घेता येणार आहेत.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
#पिंपरीचिंचवड #सुरक्षितशहर #तंत्रज्ञान #पर्जन्यमान #पूरअंदाज #पूर्वसूचनाप्रणाली #अर्लीडिटेक्शनसिस्टीम #सीडॅक #आपत्तीव्यवस्थापन #स्मार्टसिटी #cidac
